माथेरान : कुणाला कशाची आवड अन् कुणाला कुठल्या कलेवर प्रेम असते. माथेरानवरील अद्भुत निस्सीम प्रेमापोटी निसर्गाने केलेल्या जादुई लीलेने तब्बल तीनशे वेळा माथेरानच्या पायथ्यापासून विविध वाड्यांच्या मार्गे पायी भटकंती करून पुन्हा त्याच मार्गे एकूण तीनशे वेळा पायी प्रवास करण्याचा विक्र म मुंबई (मालाड) येथील प्रदीप पुरोहित यांनी के ला आहे. याची दखल घेऊन माथेरान येथे त्यांचा सत्कार नगरसेवक प्रसाद सावंत यांच्या हस्ते करण्यात आला.प्रदीप पुरोहित हे ६२ वर्षांचे गृहस्थ असून ते १९८३ पासूनच आपले परममित्र मुलराज कापडीया यांच्यासोबत पहिल्यांदा येथे आले होते, तेव्हापासून येथील निसर्गसौंदर्याने केलेल्या त्यांच्यावरील जादुई लीलयाने ते नकळत माथेरानच्या प्रेमात पडले. मुलराज यांनी २६२ वेळा पदभ्रमंती केली असून त्यांच्या निधनानंतर सुद्धा पुरोहितांनी पायी प्रवासाची आपली घोडदौड सुरूच ठेवलेली आहे. दर रविवारी ते धोदाणी मार्गे, रामबाग पॉइंट, वन ट्री हिल पॉइंट, गार्बेट पॉइंट,चौक पॉइंट अथवा चक्क नेरळहून रेल्वे रुळांंवरून एकवीस किमीचा पायी प्रवास करीत येतात आणि पुन्हा त्याच मार्गे परत जातात. येथे आल्यावर पहिल्यांदा नगरपालिकेच्या वाचनालयांमध्ये एक तासभर विविध वर्तमानपत्रांचे वाचन करतात. ते या वाचनालयाचे सदस्य असून त्यांनी २०१५ मध्ये विविध भाषांचे चौदा भगवद्गीता ग्रंथ देणगी दाखल दिलेले आहेत. या अगोदर सुद्धा पुरोहित यांनी बद्रीनाथ, केदारनाथ, अमरनाथ या भागात पायी ६४ किमी प्रवास केलेला आहे. यावेळी पॅनोरमा हॉटेलचे व्यवस्थापक बाबूनाथ रावल, माजी नगरसेवक प्रकाश सुतार आदी उपस्थित होते.
माथेरानचा तीनशे वेळा पायी प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2017 2:53 AM