कर्जत : माथेरानची लाल माती आणि जांभा दगडाचे रस्ते यातून शाश्वत विकास करायचा आहे. यातून माथेरानचे पर्यटन जतन करताना रोजगार निर्मिती करायची आहे. यासाठी माथेरानसाठी जी जी कामे होत आहेत आणि करावी लागणार आहेत, माथेरानला जगप्रसिद्ध करायचे असून हे पाहण्यासाठी स्वत: आवर्जून आल्याचे प्रतिपादन राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.
माथेरान गिरिस्थान नगरपरिषद हद्दीमधील विविध विकासकामांचे लोकार्पण आणि उद्घाटनप्रसंगी रविवारी ते बोलत होते. राज्य सरकारच्या नगरविकास आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून पूर्ण झालेल्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा आदित्य यांच्या हस्ते झाला. त्यानंतर माथेरानमधील नऊ विकासकामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.
यावेळी बोलताना पालिकेने उभारलेल्या सभागृहाचे कौतुक करताना माथेरान हे अजून सुंदर बनवायचे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले, तर पालकमंत्री आदिती तटकरे यांनी माथेरानमध्ये पर्यटक अधिक संख्येने यावेत यासाठी पर्यटन विभागाने विविध प्रकल्प आणण्याची गरज व्यक्त केली. त्यासाठी पर्यटन विभागाबरोबर नगरविकास विभाग आणि एमएमआरडीएकडून अधिक निधी मिळावा, अशी मागणी केली.
यावेळी कार्यक्रमाला अभिनेते आदेश बांदेकर, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेंद्र थोरवे, रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांच्यासह माथेरानच्या नगराध्यक्ष प्रेरणा सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, शिवसेनेचे रायगड जिल्हाप्रमुख मनोहर भोईर, शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा संघटक रेखा ठाकरे, आदी मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, येथील नागरिकांनीही विकासकामांबाबत समाधान व्यक्त केले आहे.
या विकासकामांचे झाले लोकार्पण लोकार्पण झालेल्या विकासकामांमध्ये ऑलम्पिया ग्राउंडचा पुनर्विकास करणे, माथेरान शहरातील मुख्य रस्ता ते लॉर्ड पॉइंट रस्ता विकसित करणे, मुख्य रस्ता ते बिग चौक पॉइंट रस्ता विकसित करणे, प्रीती हॉटेल ते पॅनोरमा हॉटेल रस्ता विकसित करणे आणि क्ले पेव्हर ब्लॉक लावणे, स्लाटर हाऊसचे नूतनीकरण, पंचधील नगर येथील स्वच्छतागृहाचे नूतनीकरण, मुख्य रस्ता ते मंकी पॉइंट हा रस्ता विकसित करणे, मुख्य रस्ता ते कोरोनेशन पॉइंट रस्ता विकसित करणे तसेच माथेरान नगरपरिषद हद्दीत बसविण्यात आलेल्या नावीन्यपूर्ण डस्टबिनचे लोकार्पण करण्यात आले. भूमिपूजन केलेली कामे लवकर पूर्ण करावीत असेही यावेळी सांगण्यात आले.