माथेरान : माथेरान सध्या अनेक समस्यांच्या चक्रव्यूहात सापडलेले असून त्याचा निपटारा करून येथील मूलभूत समस्या प्राधान्याने सोडविण्यासाठी निश्चितपणे आमच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल, असे मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी स्पष्ट केले. माथेरान येथील समस्यांचे गाऱ्हाणे घेऊन शिवसेनेच्या शिष्टमंडळाने ७ मार्च रोजी भेट घेतली, तेव्हा ते बोलत होते.या वेळी नगरसेवक प्रसाद सावंत, उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, बांधकाम सभापती शकील पटेल बारणे यांच्या दालनात उपस्थित होते. माथेरानमध्ये मिनीट्रेन सेवा दहा महिन्यांपासूनच अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आल्यामुळे स्थानिकांसह पर्यटकांनाही विविध अडचणींवर मात करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. यासाठी खासदार बारणे यांनी फोनवरून रेल्वेचे महाव्यवस्थापक ( डी.आर.एम.) ए. के. गोयल यांना मिनीट्रेन बाबतीत तांत्रिकदृष्ट्या ज्या अडचणी आहेत त्या मार्गी लावून लवकरच ही सेवा प्रवाशांसाठी सुरू करावी, असे सूचित केल्यानुसार गोयल यांनी एप्रिलपर्यंत ही सेवा सुरू होण्याचे आश्वासन दिले आहे. पिंपरी-चिंचवड येथील बांधकामे अधिकृत करण्यात आलेली आहेत. याच धर्तीवर माथेरानमधील बांधकामेसुद्धा अधिकृत करण्यात यावी, तसेच अत्यावश्यक सेवा म्हणून आणखी एक रुग्णवाहिका खासदार निधीतून उपलब्ध करून देण्यात यावी. दस्तुरी येथील एम. पी. प्लॉट क्र . ९३ हा पार्किंगसाठी खुला करण्यासाठी आपल्याच माध्यमातून पाठपुरावा करावा, असेही नमूद केले.
माथेरान समस्या प्राधान्याने सोडविणार
By admin | Published: March 09, 2017 2:26 AM