माथेरान : हरित लवादाच्या कारवाईमुळे माथेरानमधील नागरिकांचे धाबे दणाणले आहे. त्यांच्या निवाऱ्याची समस्या प्राधान्याने सोडवणार असून त्यांना बेघर होऊ देणार नसल्याचे आश्वासन रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिले. माथेरानमधील घर बचाव संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने रविवारी चव्हाण यांची डोंबिवली येथील कार्यालयात भेट घेऊन निवेदन दिले. या प्रकरणी जिल्हाधिकारी, रायगडच्या अधीक्षकांशी चर्चा केली असून तोडगा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले.स्थानिकांनी गरजेपोटी उभारलेली घरे वाचविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पाठीशी उभे राहावे, अशी विनंती नगरसेवक शिवाजी शिंदे यांनी केली. पिढ्यान्पिढ्या वास्तव्यास असलेल्या भूमिपुत्रांच्या घरांवर हरित लवादाचा बुलडोझर फिरणार असल्याने सर्वांची झोप उडाली आहे. अनेकांनी गरजेनुसार इथे घरे बांधलेली आहेत. माथेरानचा संपूर्ण परिसर हा जवळपास १६७० एकरांचा आहे. त्यातील एकूण पन्नास एकरांत ही निवासी घरे आहेत. अनेकांची घरे ही नगरपालिकेच्या जागेत आहेत.वीस वर्षांपासून माथेरानचा विकास आराखडाही शासनाने तयार केलेला नाही. एकूण ४२८ लोकांच्या बांधकामांची यादी नगरपालिका मुख्याधिकारी सागर घोलप यांनी सादर केली आहे. परंतु माथेरानमधील नव्वद टक्के घरे ही २००१नंतरच बांधण्यात आलेली असल्याने संपूर्ण गावाची बांधकामे अनधिकृत आहेत.
माथेरानकरांंना बेघर होऊ देणार नाही - रवींद्र चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 2:29 AM