वाहतुकीच्या कायद्याने माथेरानकर हैराण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 11:23 PM2019-01-14T23:23:09+5:302019-01-14T23:23:19+5:30
बदलाची गरज : जीवनावश्यक वस्तू गावाच्या मध्यवर्ती भागात आणण्याची मागणी
माथेरान : माथेरानमध्ये येण्यासाठी सध्या नेरळ मार्गे येणे हा एकच पर्याय आहे. तर गावात पर्यटकांना वाहून नेण्यासाठी अंतर्गत वाहतुकीसाठी हात रिक्षा आणि घोडे हीच व्यवस्था कार्यान्वित आहे. यासाठी आगामी काळात हात रिक्षा चालकांना या अमानवीय प्रथेतून मुक्ती मिळेल तेव्हा मिळेल मात्र सध्या स्थानिकांसाठी काही पर्याय उपलब्ध होणे आवश्यक आहे. दस्तुरी नाका येथून जीवनावश्यक वस्तू आणि इमारतीसाठी लागणारे साहित्य जे सर्वसामान्य लोकांना वाढीव दराने खरेदी करणे परवडणारे नाही, यामुळे ते तरी निदान गावाच्या मध्यवर्ती भागात आणावे अशीच मागणी स्थानिकांकडून होत आहे.
ब्रिटिश काळापासून असलेली नियमावली आणि जाचक अटी मोडीत काढून येथील कायद्यात सुधारणा केल्याशिवाय हे गाव विकासाच्या दिशेने वाटचाल करणार नाही. स्वातंत्र्य पूर्वार्धात स्थापन करण्यात आलेल्या माथेरानमध्ये स्वातंत्र्याच्यानंतर सुद्धा आजवर वाहतुकीची सोय उपलब्ध नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. दस्तुरी या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत सर्वच प्रकारचा माल येत असून पुढील वाहतुकीची व्यवस्था ही घोड्यावर आणि मानवी हातगाडीच्या माध्यमातून केली जात आहे. त्यामुळे खूपच महाग आणि वाढीव दराने वस्तू खरेदी कराव्या लागतात. यासाठी निदान मालवाहतूक टेम्पो हे गावाच्या मध्यवर्ती भागात आणल्यास सर्वांनाच सोयीस्कर होऊ शकते अशीच मागणी सध्या जोर धरू लागली आहे. माथेरानचा शोध १८५० मध्ये लागल्यावर तेव्हापासून ते आजतागायत सर्वच प्रकारचे सामान हे घोडा आणि हातगाडीमधून येत आहे.
येथील अनेक विकासकामे आजही प्रलंबित आहेत. रस्ते दुरु स्तीसाठी लागणारे जांभे दगड, पेव्हर ब्लॉक अथवा रेती, सिमेंट, खडी, लोखंड त्याचप्रमाणे अन्य सामान हातगाडी आणि घोड्यावर येत असते. तर जीवनावश्यक वस्तू सुध्दा अशाचप्रकारे आणल्या जातात. ही खूपच खर्चिक बाब असून ऐनवेळी पावसाळ्यात मजुरांअभावी माल दस्तुरी येथे भिजत असतो. त्यामुळे मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते. स्थानिक नागरिक आजही एखाद्या पर्यायी व्यवस्थेच्या आशेवर आहेत. परंतु शासनाला याबाबत काहीच स्वारस्य नसल्याचे दिसून येत आहे. अनेक भागातून येथे येण्यासाठी मार्ग उपलब्ध होऊ शकतात, याचा शासनाने सकारात्मक विचार करून स्थानिकांची समस्या सोडवावी, अशी मागणी जोर धरत आहे.
माथेरान मिनीट्रेनमधील एक मालवाहू बोगी रेल्वेने मालवाहतूक करण्यासाठी दिल्यास जीवनावश्यक वस्तू आणणे सोयीस्कर होऊ शकते यासाठी आम्ही स्वत: आणि मुख्याधिकारी रामदास कोकरे हे सातत्याने रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करीत आहोत.
- प्रेरणा सावंत,
नगराध्यक्षा