नेरळ येथील बुऱ्हानी पार्कसाठी पळवले माथेरानकरांचे पाणी; स्थानिक संतप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: December 18, 2020 11:54 PM2020-12-18T23:54:16+5:302020-12-18T23:54:24+5:30
जुम्मा पट्टी येथील पम्पिंग स्टेशनमधून पाइपलाइनद्वारे दिले पाणी; कारवाईची मागणी
- मुकुंद रांजणे
माथेरान : माथेरानसाठी नेरळ येथून असलेल्या पाणीपुरवठा योजनेतून नेरळ येथील बुऱ्हानी पार्क या धनदांडग्या वसाहतीस जुम्मा पट्टी येथील पम्पिंग स्टेशन येथून तीन इंची पाइपलाइनद्वारे पाणी दिले गेले असल्याचे निदर्शनास आल्यानंतर माथेरानमध्ये प्रचंड जनरोष उफाळला. हे पाणी पळविण्यास मदत करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यासाठी माथेरानकर सरसावले आहेत.
तत्कालीन जलसंपदा मंत्री सुनील तटकरे, माजी आमदार सुरेशभाऊ लाड व माजी नगराध्यक्ष अजय सावंत यांच्या प्रयत्नातून माथेरानकरिता ४० कोटी रुपयांची शून्य अनुदानातून फक्त माथेरानकरिता नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर झाली होती. त्यामुळे माथेरानमधील पाणीटंचाईचा प्रश्न कायमचा मिटला होता. ही योजना सुरू झाल्यानंतर पाण्याचे दरही वाढले होते. बहुदा जिल्ह्यातील सर्वांत महागडे पाणी हे माथेरानकर विकत घेत आहेत. काही वर्षांमध्ये याच योजनेतून येथील गावांना पाणी जोडण्या देण्यात आल्या आहेत. या आदिवासी वाड्या असल्याने माथेरानकरही त्यावर आक्षेप घेत
नव्हते. पण, जलप्राधिकरण इतके निर्ढावले आहे की त्यांनी आता वाणिज्य वसाहतीस पाणी विकले आहे.
पैशाच्या जोरावर माथेरानचे पाणी पळविण्यासाठी बुऱ्हानी पार्क मागील दीड वर्षापासून प्रयत्नशील आहे. त्यांचा एक प्रयत्न माथेरानकरांच्या एकजुटीमुळे फसला होता. त्या वेळी जलप्राधिकरण व माथेरान पालिकेने त्यांना ना हरकत प्रमाणपत्र दिले होते. ते ताबडतोब रद्द करण्यात आले होते. पण, बुऱ्हानी पार्कवाल्यांनी ह्या वेळी थेट जलप्राधिकरणाच्या वरिष्ठ पातळीवरूनच हे पाणी मिळावे असे परवानापत्र आणले असून, त्याच्यामध्ये काही अधिकाऱ्यांच्या संगनमताने पळवाट काढताना जुमापट्टी येथील माथेरान लाइनवरून पाणी न देता येथील टाक्यांमधून प्रक्रिया न केलेले पाणी देत असल्याचे सांगितले आहे. हे पाणी अशुद्ध असल्याचे कारण जलप्राधिकरणाने दिले आहे. त्यामुळे अशुद्ध पाणी बुऱ्हानी पार्कसारख्या धनदांडग्या लोकांनी इतक्या इरेला पेटून का घेतले? हा मुद्दा समोर येत असून माथेरान पालिकेने येथून पाणी घेण्यास परवानगी नाकारल्यानंतर कुणामार्फत या परवानग्या वरिष्ठ पातळीवरून मिळविल्या? याची चर्चा माथेरानमध्ये होत आहे.
पाणी पडणार कमी
बुऱ्हानी पार्कसारख्या खासगी वसाहती माथेरानचे पाणी चोरण्यासाठी पुढे येत असून असेच राहिले तर माथेरानला पाणी कमी पडणार आहे. या अनधिकृत जोडण्या वाढत जाणार आहेत.
त्यामुळे पाणी प्रश्नांवर माथेरानची जनता एकवटली असून, ही जोडणी त्वरित रद्द करण्यात यावी व ही जोडणी मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सर्वांवर कायदेशीर कारवाई व्हावी याकरिता गावपातळीवर सर्वपक्षीय व गावकऱ्यांच्या सभेचे लवकरच आयोजन करणार आहेत.
माथेरान पालिकेने माथेरानला येणाऱ्या पाणीवाहिनीवरून बुऱ्हानी पार्कला पाणी देऊ नये, असे लेखी स्वरूपात पत्र जलप्राधिकरणाला दिले होते. पण पालिकेला अंधारात ठेवून बुऱ्हानी पार्कने वरिष्ठ पातळीवरून ही परवानगी आणल्याचे समजते. यावर चौकशी करून पालिकेकडून कारवाई केली जाईल. -प्रेरणा सावंत, नगराध्यक्षा, माथेरान
राजकीय नेते व जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी यामध्ये गैरव्यवहार केला असून माथेरानसाठी कार्यान्वित पाणी योजना भविष्याची गरज म्हणून तयार केली असून, या पाणीचोरीमुळे भविष्यात कमी पाण्याअभावी पर्यटन धोक्यात येणार आहे.
- शिवाजी शिंदे, विरोधी पक्षनेते, माथेरान नगर परिषद