कर्जत : कर्जत येथील उपविभागीय अधिकारी ए. टी. येरडीकर यांनी माथेरानमध्ये संयुक्त बैठक घेऊन घोडेवाल्यांना परिवाराप्रमाणे राहण्याचा सल्ला दिला व जर पर्यटकांची फसवणूक केली तर सुरुवातीस १४९ अन्वये संबंधितास नोटीस दिली जाईल. तरीसुद्धा फसवणूक सुरू असेल तर १८८ नुसार गुन्हा दाखल करू, असा सज्जड दम दिला. तर मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी दस्तुरी येथे जी लिदीची घाण होत असते ती घोडेवाल्यांनी स्वत: साफ करावी व प्रशासनाचा सन्मान करावा, असे सभेमध्ये नमूद केले. त्यामुळे घोडेवाल्यांचे धाबे दणाणले आहेत.
मुंबई-पुण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या माथेरानमध्ये पर्यटकांची सतत गर्दी असते. या पर्यटकांना फिरण्यासाठी घोडा हे वाहन आहे. त्यामुळे पर्यटक आवर्जून या घोड्यावर बसतो, मात्र गेले काही महिने येथे पर्यटकांची फसवणूक आणि दिशाभूल करण्याच्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रवाशांकडून जास्त पैसे उकळणे, त्यांना खोटे पॉइंट दाखविणे,त्यांची दिशाभूल करणे, खासगी वाहनांच्या मागे धावणे या सर्व गोष्टींमुळे पर्यटक पुरते हैराण झाले आहेत, त्यामुळे त्यांनी यावर्षी मे महिन्याच्या पर्यटन हंगामाला पाठ दाखवली. त्यामुळे माथेरानचा व्यवसाय हा पन्नास टक्क्यांहून खाली आला होता, त्यात दस्तुरीवरील घोडेवाल्यांची चुकीची माहिती सांगणे यामुळे येथील व्यावसायिक हवालदिल झाले होते.
याबाबत काही लोकांनी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत व स्थानिक अश्वपाल संघटनेच्या अध्यक्षा आशा कदम यांच्याकडे तक्रार केली होती. यानंतर नगराध्यक्षा व अश्वपाल अध्यक्ष यांनी थेट घोड्यावर बसलेल्या पर्यटकांना दर किती घेतला असे विचारून नगरपालिकेमार्फत पोलिसात दस्तुरीवरील घोडेवाल्यांचे तक्रार पत्र दिले व पर्यटकांना विचारलेल्या दराबाबतचे व्हिडीओ व्हायरल केले. त्यानुसार माथेरानमध्ये आयोजित केलेल्या संयुक्त बैठक घेऊन घोडेवाल्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.