पाच महिन्यानंतर माथेरानची ‘महाराणी’ ऐटीत पुन्हा रूळावर, पावसाळ्यानंतर मिनिट्रेन सेवा सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2024 08:33 AM2024-11-07T08:33:24+5:302024-11-07T08:34:07+5:30
- मुकुंद रांजणे माथेरान - बुधवारी सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी मोठ्या आवाजात गाडीची शीटी झाली आणि बहुप्रतिक्षित माथेरानची ...
- मुकुंद रांजणे
माथेरान - बुधवारी सकाळी ८ वाजून २५ मिनिटांनी मोठ्या आवाजात गाडीची शीटी झाली आणि बहुप्रतिक्षित माथेरानची महाराणी अर्थान मिनी ट्रेन रूळावर दिमाखाने झुकू झुकू करत पळायला लागली. नेरळ रेल्वे स्थानकात १११ प्रवाशांना घेऊन या राणीने हंगामातील आपला पहिला प्रवास सुरू केला.
पर्यंटकांना खुणावणारी नेरळ ते माथेरान ही मिनीट्रेन सेवा पावसाळी काळात बंद असते. यावर्षी पाऊस परतला तरी ही सेवा सुरू न झाल्याने नाराजी व्यक्त होत होती. पण बुधवारी नेरळ रेल्वे स्थानकातून निघालेली ही ट्रेन माथेरान स्थानकात ११ वाजून ३५ मिनिटांनी पोहचली आणि सर्वांनी जल्लोष केला. पाच महिन्यानंतर सुरू झालेल्या या पहिल्याच सेवेचा लाभ ९० प्रौढ व्यक्तींसह २१ लहान मुलांनी घेतला.
हे महाराणी, पर्यटन हंगाम खूप बहरू दे...
या ट्रेनचे सारथ्य मुख्य चालक म्हणून ठाणगे, तर सहचालक म्हणून लक्ष्मण हाबळे यांनी केले. दुसरी ट्रेन १० वाजून २५ मिनिटांनी निघाली ती १ वाजून ३० मिनिटांनी १०२ प्रवाशांना घेऊन माथेरानला पोहचली.
चालक व स्टेशन प्रबंधक यांच्या हस्ते पूजा अर्चा करून या ट्रेनचे स्वागत करण्यात आले. नेरळ रेल्वे स्थानकातून समारंभपूर्वक हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ट्रेनने माथेरानच्या दिशेने प्रस्थान केले.
५ महिन्यांच्या विश्रांतीनंतर सेवेत
- पर्यटकांच्या सुरक्षेसाठी मान्सून काळात नेरळ ते माथेरान ही सेवा बंद ठेवण्यात येते. यावर्षी १६ जून रोजी ही सेवा बंद झाली होती.
- दरवर्षी साधारण दसऱ्याला ही सेवा पूर्ववत केली जाते. मात्र देखभाल दुरुस्तीची कामे निघाल्याने यंदा ही सेवा सुरू होण्यास विलंब झाला. या काळात अमन लॉज ते माथेरान ही शटल सेवा मात्र सुरू राहते.
आम्ही दुसऱ्यांदा माथेरानला फिरायला येत आहोत. सोबत आमचे राजस्थानचे कुटुंबही आहे. ट्रेन सुरू होणार आहे हे माहीत नव्हतं. पण इथे आल्यावर ते कळलं. खूप उत्साहित आहोत, या ट्रेनचा प्रवास करण्यासाठी.
-सपना जैन, प्रवासी ऐरोली
माथेरानमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडून रेल्वे ट्रॅक नादुरुस्त होत असतात. गेले काही महिने कर्मचारी ट्रॅक दुरुस्तीच्या कामाला लागले होते. दुरूस्तीनंतर ही सेवा सुरू झाली असून दिवसभरातून दोन फेऱ्या चालवल्या जातील. यासह अमन लॉज ते माथेरान शटल सेवा ही सुरूच आहे.
-गुरुनाथ पाटील,
स्टेशन प्रबंधक, नेरळ