माथेरानच्या मिनी ट्रेनचे जुने डबे भंगारात
By admin | Published: April 19, 2016 02:22 AM2016-04-19T02:22:21+5:302016-04-19T02:22:21+5:30
नेरळ-माथेरान मिनीट्रेनचे जुने प्रवासी डबे भंगारात काढले आहेत. नेरळ लोकोच्या बाहेर ३० वर्षांपूर्वीचे ९ प्रवासी डब्यांचे भाग सुटे करण्यात येत आहेत
विजय मांडे, कर्जत
नेरळ-माथेरान मिनीट्रेनचे जुने प्रवासी डबे भंगारात काढले आहेत. नेरळ लोकोच्या बाहेर ३० वर्षांपूर्वीचे ९ प्रवासी डब्यांचे भाग सुटे करण्यात येत आहेत. जुन्या पध्दतीचे मिनीट्रेनचे ते प्रवासी डबे अनेकांच्या स्मरणातील आठवण ठरले आहेत, त्यांचे सुटे भाग होताना अनेक पर्यटक प्रवाशांनी हळहळ व्यक्त केली. खरे तर हे डबे संग्रही ठेवावेत, असेही काहींनी सूचित केले आहे.
शतक महोत्सव साजरा केलेल्या नेरळ-माथेरान मिनीट्रेनच्या आजपर्यंतच्या वाटचालीमध्ये अनेक बदल झाले आहेत. पूर्वी मिनीट्रेन वाफेचे इंजिन लावून जायची, त्यावेळी पावसाळ्यानंतर मिनीट्रेनच्या इंजिनामुळे रेल्वे मार्गाच्या आजूबाजूचा परिसर जळून जात होता. पुढे हे इंजिन डिझेलवर चालविले जाऊ लागले. आता ती वाफेवर चालणारी इंजिने डिझेलमध्ये रूपांतरित करण्यात आली आहेत, असे मोठे बदल मिनीट्रेनच्या प्रवासी डब्यांमध्ये रेल्वेने केले आहेत. १९७०-८० च्या दशकात नेरळ-माथेरान मिनीट्रेनच्या प्रवासात जे प्रवासी डबे वापरले गेले होते तेच त्यावेळी पावसाळ्यात देखील वापरले जायचे. दहा-पंधरा वर्षे प्रवासी पर्यटकांच्या सेवेत असलेल्या मिनीट्रेनच्या त्या प्रवासी डब्यांचे सर्व भाग खिळखिळे झाले होते. दुसरी बाब म्हणजे मागील दोन वर्षात मिनीट्रेनच्या दोन फेऱ्यांचे नवीन डबे नेरळ लोकोमध्ये पोहचले आहेत. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने ते नऊ प्रवासी डबे भंगारात काढण्याचा निर्णय घेतला.ते नेरळ लोकोच्या बाहेरून नेणे शक्य नसल्याने अखेर एका बाजूला घेवून त्या सर्व प्रवासी डब्यांचे भाग सुटे करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार ते प्रवासी डब्यांचा लिलाव घेतलेल्या ठेकेदाराने त्यांचे सुटे भाग वेगळे केले आहेत.