माथेरान : माथेरान पालिका क्षेत्रात इंधनावर चालणा-या वाहनांना बंदी आहे, मात्र विशेष बाब म्हणून रुग्णवाहिकेस येथे परवानगी आहे व ही रुग्णवाहिका ठेकेदारी पद्धतीने चालविली जाते. या ठेकेदाराची मुदत संपल्याने ही सेवा बंद झाली असल्याने रु ग्णांचे मात्र हाल होत असून, पर्यायी व्यवस्था करण्यास पालिका अपयशी ठरली आहे.ब्रिटिशकालीन पर्यटन क्षेत्र असलेल्या माथेरानचे क्षेत्रफळ ७.३५ स्क्वेअर कि.मी. आहे. येथील बहुतांशी भाग हा जंगलाने व्यापला आहे त्यामुळे येथे कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्या ठिकाणी पोहचण्यास तारेवरची कसरत करावी लागते. तसेच येथे असलेल्या मर्यादित वैद्यकीय व्यवस्थेमुळे माथेरानकरांनी अनेक वर्षे पाठपुरावा करून माथेरानसाठी रुग्णवाहिका सेवा मिळविली, पण सेवा चालविण्यासाठी त्यांनी ठेकेदारी हा पर्याय अवलंबला व गेली अनेक वर्षे याच पद्धतीने ही सेवा सुरू आहे. मागील काही महिन्यांपासून या ठेकेदारास त्याचे मानधन देण्यास पालिकेकडून टाळाटाळ केली जात आहे. सहा महिन्यांपूर्वीच ठेका संपल्यानंतरही करारनाम्यानुसार सहा महिन्यांपर्यंत नवीन ठेकेदार येईपर्यंत ही सेवा सुरू ठेवण्याची अट असल्याने त्याने ही सेवा सुरू ठेवली होती. मात्र त्याचा कार्यकाळही संपल्याने त्याने पुढे रु ग्णवाहिका चालविण्यास असमर्थता दर्शविली आहे. मागील सहा महिन्यांपासून त्याचे मानधन देण्यास पालिकेकडून टाळाटाळ केली जात आहे. प्रत्येक वेळी वेगवेगळी कारणे दाखवून चालढकल करण्यात येत असल्याने कंटाळून त्याने यापुढे रुग्णवाहिका करार न करण्याचा निर्णय घेतला. कालपासून रुग्णवाहिकेवर चालकच नसल्याने येथील रु ग्णांची परवड होत असून येथील रुग्णालयाशी संपर्क साधला असता रु ग्णवाहिका बंद असून १०८ रु ग्णवाहिकेशी संपर्क करा असे सांगण्यात येते.
आधीच व्हेंटिलेटरवरअसलेल्या वैद्यकीय सेवेत रुग्णवाहिका बंद असल्याने माथेरानकरांच्या चिंतेत अजून भर पडली आहे. माथेरानकरांनी मोठ्या संघर्षानंतर मिळविलेली ही सेवा सरकारच्या अनास्थेमुळे बंद होतेय की काय अशी चर्चा सर्वत्र सुरू आहे.मागील सहा महिन्यांपासून करार संपला असतानाही केवळ माथेरानमधील नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून सहा महिने ही सेवा सुरू ठेवली, पण पालिका अधिका-यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून ही सेवा यापुढे सुरू ठेवण्यास असमर्थ आहे.- अविनाश कदम, रु ग्णवाहिका चालक