लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : पर्यटकांची लाडक्या माथेरानच्या टॉय ट्रेनने यंदाच्या उन्हाळ्यात महसुलाचा विक्रम नोंदवला आहे. मार्च ते मे या तीन महिन्यांत नेरळ ते माथेरान या टॉय ट्रेनला एक कोटी रुपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आहे.
मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मार्च ते मे या कालावधीत अमन लॉज ते माथेरान यादरम्यानच्या शटल सेवेसह एक लाख ३१ हजार ४८१ प्रवाशांनी टॉय ट्रेन सुविधेचा लाभ घेतला. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही संख्या १७ टक्क्यांनी अधिक आहे. या कालावधीत टॉय ट्रेनने एक कोटी एक लाख २८ हजार ४२४ रुपये एवढे उत्पन्न कमावले. ही आकडेवारी या पर्यटनस्थळी येणाऱ्या प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवास उपलब्ध करून देण्यात रेल्वेची महत्त्वाची भूमिका दर्शवते.