- अजय कदम । लोकमत न्यूज नेटवर्क
माथेरान : पर्यटनस्थळ माथेरानमध्ये मोटारवाहनांना बंदी असल्याने येथे वाहन म्हणून घोडा प्रसिद्ध आहे. या घोड्यांच्या औषधोपचारासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून श्रेणी एक पशुवैद्यकीय दवाखाना आहे; परंतु या दवाखान्याच्या परिसरात आजारी घोडे कमी आणि दावणीला बांधलेले घोडे जास्त दिसत आहेत, त्यामुळे या दवाखान्याला घोड्यांच्या तबल्याचे स्वरूप आले आहे.माथेरानमध्ये घोड्यांची अधिकृत संख्या ४६२ असून माथेरानमधील, तसेच माथेरानबाहेरील परिसरांतील घोडेवाले पर्यटकांना माथेरान फिरवतात; परंतु हा व्यवसाय करत असताना माथेरानबाहेरील काही घोडेवाल्यांकडे माथेरानमध्ये घोड्यांचा तबेला नसल्यामुळे घोड्यांना पावसापासून वाचविण्यासाठी मिळेल त्या छपराखाली घोडे बांधत आहेत. जिल्हा परिषदेमार्फत नुकत्याच या दवाखान्याचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या दवाखान्याच्या चहुबाजूने कंपाउंड टाकण्यात आले आहे. डॉक्टरांची केबीन, औषधांचे गोडाऊन, औषधे वाटपाची रूम, तसेच आजारी घोड्यांना बांधण्यासाठी नवीन शेड यांचे नूतनीकरण केले आहे; परंतु येथे आजारी घोडे न बांधता बेदरकारपणे तबेला नसलेले घोडेवाले या दवाखान्याच्या शेडमध्ये घोडे बांधत आहेत.या पशुवैद्यकीय दवाखान्याच्या आजूबाजूला व दरवाजाच्या समोर रात्रीच्या वेळी घोडे बांधले जातात. त्या घोड्यांची लीद दरवाजासमोर ठेवून जातात व तोंडी सूचना देऊनही ते घोडेवाले ऐकत नाहीत, त्यामुळे दवाखान्याच्या आवारात दुर्गंधी पसरून मच्छर झाले आहेत, त्यामुळे रोगराई होऊ शकते.- राम तिटकारे, परिचारक, पशुवैद्यकीय दवाखानागेली दोन वर्षे उन्हाळा, पावसाळा हे घोडे बिनधास्त आमच्या आवारात बांधले जातात, त्या घोडेमालकांना घोडे हटविण्यास सांगितले असता, अरेरावीची भाषा केली जात आहे. याबाबत वारंवार पोलीस ठाण्यात लेखी तक्र ारी केल्या आहेत आणि कारवाई करावी, अशा आशयाचे पत्र पोलीस प्रशासनाला देण्यात आले आहे.- धर्मराज रायबोले, पशुधन विकास अधिकारी, माथेरान