मोरा-भाऊचा धक्का सागरी प्रवास होणार स्वस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2019 01:11 AM2019-09-01T01:11:26+5:302019-09-01T01:11:47+5:30
संडे अँकर । रविवारपासून १८ रुपयांची कपात : पावसाळी हंगामामुळे विस्कळीत झालेली वाहतूक होणार सुरळीत
रेवस, मांडवा सेवाही लवकरच सुरू होणार
भाऊचा धक्का-रेवस आणि मांडवा-मुंबई या सागरी मार्गावरील प्रवासी वाहतूकही पावसाळी हंगामात बंद केली जाते. मात्र, या दोन्ही मार्गावरील प्रवासी वाहतूक खराब हवामानामुळे सुरू करण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे या मार्गावरील प्रवासी वाहतूक हवामान सुरळीत झाल्यावरच पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती बंदर विभागाकडून देण्यात आली.
उरण : मोरा-भाऊचा धक्का सागरी मार्गावरील पावसाळी हंगामासाठी वाढविण्यात आलेले तिकिटाचे दर १ सप्टेंबरपासून कमी करण्यात येणार आहेत. त्यामुळे या सागरी मार्गावरील प्रवास रविवारपासून १८ रुपयांनी स्वस्त होणार आहेत.
पावसाळी हंगामासाठी या मार्गावरील विस्कळीत आणि अनियमित झालेली प्रवासीवाहतूक सुरळीत होणार असल्याची माहिती मोरा बंदर विभागाचे अधिकारी पी. बी. पवार यांनी दिली.
मोरा-भाऊचा धक्का सागरी मार्गावर उन्हाळी हंगामात दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असते. मुंबईसाठी जवळचा आणि स्वस्तातील सागरी मार्ग असल्याने प्रवासीही शक्यतो याच मार्गाला पसंती देतात. दरवर्षी जून ते आॅगस्टदरम्यान पावसाळी हंगामासाठी तिकीटदरात वाढ केली जाते. तशी या हंगामासाठी तिकीटदरात ५५ रुपयांवरून ७३ रुपयांपर्यंत अशी तब्बल १८ रुपयांची वाढ करण्यात आली होती. मात्र, पावसाळ्यात वाढविण्यात आलेले तिकिटाचे दर १ सप्टेंबरपासून पुन्हा पूर्ववत होणार आहेत.