उरण : साडेचार वर्षांत एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्यानंतरही लोकसभा निवडणुकीत सेना-भाजपची अखेर युती झाली खरी. मात्र, सेना-भाजपकडून झालेल्या परस्परांविरोधी चिखलफेकीमुळे दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये अद्याप मनोमिलन झालेले दिसत नाही. त्यामुळे मावळ आणि रायगड लोकसभा मतदारसंघात सेना-भाजप महायुतीचे उमेदवार अनुक्रमे श्रीरंग बारणे व केंद्रीय मंत्री अनंत गीते यांना स्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे.
मावळमधून सेनेने दोन वेळा लोकसभेत प्रतिनिधित्व केले आहे. २००९ मध्ये गजानन बाबर यांनी राष्ट्रवादीच्या आझम पानसरे यांना पराभव केला. मात्र, केंद्रात विरोधक सत्तेवर असल्याने मावळ मतदार संघातील विकासकामे बाबर यांना करणे शक्य झाले नाही.२०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत शेकापच्या लक्ष्मण जगताप यांना पराभूत करून मावळचा किल्ला श्रीरंग बारणे यांनी सर केला होता. खरं तर मोदी लाटेवर आरूढ होऊनच बारणे यांच्या गळ्यात विजयाची माळ पडली होती. तसेच केंद्रातही सेना-भाजपची स्वबळावर सत्ताही स्थापन झाली.सत्तेची जोड मिळाल्यामुळे खासदार बारणे यांच्याबद्दल उरण, पनवेल, कर्जत, मावळ, पिंपरी, चिंचवड या सहा विधानसभा मतदार संघातील जनतेच्या अपेक्षा चांगल्याच उंचावल्या होत्या. मात्र, मावळ, पिंपरी, चिंचवड या विधानसभा मतदार संघातील जनतेचे प्रश्न सोडविण्यात यश आले की नाही, हे जनताच सांगू शकेल. उरण, पनवेल, कर्जत विधानसभा मतदार संघात विकासाची फारशी कामेच केली नसल्याने बारणे यांना संसदरत्न पुरस्काराच्या मुद्द्यावरच प्रचारात भर देण्यास सुरु वात केली आहे. या तिन्ही विधानसभा मतदार संघात झालेल्या बहुतांश विकासकामांचे श्रेय मागील साडेचार वर्षांत सेना-भाजपमध्ये आलेल्या वितुष्टांमुळे खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच जाते. मात्र, भाजपाच्या श्रेयावर आता सेना पोळी भाजत असल्याचे चित्र समोर आले आहे़