अलिबाग- भारत सरकार व जागतिक आरोग्य संघटना यांच्या वतीने सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयामार्फत मंगळवार (27 नोव्हेंबर) पासून मिझेल रुबेला लसीकरण अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानात रायगड जिल्ह्यात 9 महिने ते 15 वर्षे वयोगटातील 7 लाख 93 हजार 451 बालकांना या लसीकरण करण्यात येणार आहे. दरम्यान मंगळवार (27 नोव्हेंवर) ते शुक्रवार (30 नोव्हेंबर) अखेर या अभियानांतर्गत जिल्ह्यातील 1 लाख 36 हजार 262 बालकांना गोवर-रुबेला लसीकरण करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
जिल्हा आरोग्य अधिकारी व जिल्हा शल्य चिकित्सक या दोन्ही आरोग्य यंत्रणांमार्फत हे अभियान अनुक्रमे ग्रामीण व शहरी भागात राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेच्या अलिबाग, उरण,पनवेल, महाड, कर्जत, पेण, रोहा, श्रीवर्धन, मुरुड, खोपोली, माथेरान या शहरी भागाच्या कार्यक्षेत्रातील 1 लाख 87 हजार 378 इतक्या बालकांना तर ग्रामीण भागातील 6 लाख 6 हजार 206 बालकांना अशा एकूण 7 लाख 93 हजार 451 बालकांना एकूण 9640 लसीकरण सत्रात लसीकरण केले जाईल.
पहिला टप्प्यात जिल्ह्यातील शाळकरी विद्यार्थ्यांना लसीकरण होणार आहे. नंतर 11 डिसेंबर पासून बाह्यसत्रात शाळांव्यतिरिक्त अन्य बालकांपर्यंत हे लसीकरण पोहोचविले जाणार आहे. जिल्हा आरोग्य यंत्रणेमार्फत प्राप्त अहवालानुसार 30 नोव्हेंबर रोजी दिवसअखेर जिल्ह्यातील 320 शाळांमध्ये लसीकरण राबविले. यात 53 शाळांमध्ये जिल्हा शल्यचिकित्सकांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 8590 विद्यार्थ्यांना तर 267 शाळांमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या अखत्यारीतील यंत्रणेमार्फत 25 हजार 303 विद्यार्थ्यांना अशा एकूण 33 हजार 893 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले. तर आज अखेर एकूण 71 हजार 453 मुले व 64 हजार 809 मुली असे एकूण 1 लाख 36 हजार 262 विद्यार्थ्यांना लसीकरण करण्यात आले, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन देसाई यांनी दिली आहे.