पोलादपूर : आजही सर्वसाधारण माणूस बदललेला नाही, त्यामुळे न्यायव्यवस्थेशिवाय पर्याय नाही. परंतु दुर्गम डोंगराळ भागात भौतिक सुविधांच्या अभावामुळे ग्रामीण भागातील जनतेला प्रामुख्याने तळागाळातील गोरगरिबांना न्याय मिळावा, त्यांचे जीवन सुखकारी व समृद्ध व्हावे म्हणून तालुक्याच्या ठिकाणी ग्रामन्यायालये सुरू करण्यात येत आहेत, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या न्या. रेखा सोंडूर बलदोटा यांनी पोलादपूर येथे महाड बार वकील असोसिएशनच्या वतीने आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते ग्रामन्यायालयाचे उद्घाटन झाले.यावेळी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात तुटे वादविवाद, संवाद तो हितकारी, या समर्थांच्या ओवीचा उल्लेख करून त्या म्हणाल्या, या ग्रामन्यायालयाच्या माध्यमातून तंटे बखेडे, वादविवाद हे सुसंवादाने सुटतील अशी अपेक्षा आहे. या कार्यक्रमप्रसंगी रायगड जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीराम मोडक, दिवाणी न्यायाधीश अविनाश क्षीरसागर, महाड बार असोसिएशन अॅड. उदय देशमुख, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे, आ. भरतशेठ गोगावले आदी उपस्थित होते.शारीरिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना या ग्रामन्यायालयांच्या माध्यमातून न्याय मिळणार असून दोन वर्षे शिक्षेपर्यंतचे दिवाणी व फौजदारी खटले चालविले जातील, अशी माहिती न्या. मोडक यांनी दिली.
ग्रामीण जनतेच्या न्यायासाठी उपाययोजना
By admin | Published: January 19, 2016 2:15 AM