रोगराई पसरण्याआधी उपाय गरजेचा; महाड नगरपालिकेसमोर आव्हान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 11:08 PM2019-08-09T23:08:51+5:302019-08-09T23:08:55+5:30
पुरामुळे झाले घरातील साहित्याचे नुकसान; मेलेल्या उंदीर, घुशींमुळे दुर्गंधी
- सिकंदर अनवारे
दासगाव : महाड शहरात आलेल्या पुराने अनेक घरे आणि दुकाने उद्ध्वस्त झाली आहेत. व्यापाऱ्यांचा लाखोचा माल यामध्ये भिजला तर घरातील फर्निचर, बिछाना, किराणा आणि कपडे या पुराच्या पाण्यात खराब झाले आहे. पुराच्या पाण्यात आलेल्या चिखलाने या सामानाचे नुकसान अधिक झाले. हे भिजलेले सामान लोकांनी दुसºयाच दिवशी बाहेर काढले. या भिजलेल्या मालासह मेलेल्या उंदीर आणि घुशींची दुर्गंधी वाढू लागली आहे. यामुळे रोगराई पसरण्याआधीच उपाययोजना होणे गरजेचे आहे. महाड नगरपालिकेसमोर हे एक मोठे आव्हान आहे. नियमित यंत्रणेपेक्षा अधिक कामगार लावून महाडमध्ये साफसफाई आणि जंतुनाशक फवारणीवर भर दिला जात आहे.
महाडमध्ये आलेल्या पुराने शहरातील सर्वच भाग बाधित झाले होते. यामुळे अनेकांचे संसार या पुराच्या पाण्यात बुडाले. घरातील सामान या पुराच्या पाण्यात भिजले गेले. दुकानातील सामान बुडाले. दुसºया दिवशी घरातील साफसफाई करताना अनेकांच्या नाकीनऊ आले. पुराच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात चिखल आला होता, यामुळे मोठे नुकसान झाले. भिजलेला माल, घरातील चिखल आणि कपडे, बिछाना, आदी सामान लोकांनी रस्त्यावर आणून टाकले आहे. दुसºया दिवशी देखील हा चिखल तसाच पडून राहिला होता. त्यावरून गाड्या जात असल्याने भिजलेल्या मालाचा चिखल अधिकच होत होता. महाड नगरपालिकेने याबाबत त्वरित कार्यवाही करण्यास युद्धपातळीवर सुरुवात केली आहे.
महाड शहराला पाणीपुरवठा करणाºया कुर्ला धरणाची पाइपलाइन दादली पुलावरील प्रवाहात वाहून गेल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला. सोसायटीच्या टाक्यातून देखील पुराचे पाणी गेल्याने चिखल साचला आहे, यामुळे अनेक सोसायट्यांमधून पिण्याच्या पाण्यासाठी लोकांना भटकंती करावी लागली. महाड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दादलीजवळ असलेली पाइपलाइन देखील संपूर्ण रात्र काम करून युद्धपातळीवर जोडली आहे. यामुळे शहरातील प्रभात कॉलनी, कुंभार आळी आदी भागातील पाणीपुरवठा पूर्ववत करण्यात नगरपालिकेला यश मिळाले आहे. दादली येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात गॅस क्लोरिनेशन आणि तुरटी प्रक्रिया केली जात असल्याने नागरिकांनी पाण्यात गढूळपणा असला तरी घाबरून जाऊ नये, असेही सांगण्यात आले आहे. साफसफाई सुरूच असली तरी बाजारपेठ सुरळीत होण्यास अद्याप दोन दिवस जाणार असल्याने बाजारपेठेतील व्यवहार आजही ठप्पच आहेत.
नागरिकांनी काळजी घ्यावी
महाड नगरपालिकेने पूर ओसरताच संपूर्ण बाजारपेठ केंद्रित करून पडलेला कचरा उचलण्यास सुरुवात केली. महाड बाजारपेठेत ८० टक्के सफाई पूर्ण झाली असून याकरिता ५ डम्पर, २ जेसीबी, ३ टिपर याद्वारे ही सफाई करण्यात आली. गुरुवारी रात्री रस्त्यातील गाळ फायर फायटरने धुण्यात आला असून संपूर्ण शहरात फॉगिंग, स्प्रे फवारणी, जंतुनाशक पावडर, धूर फवारणी सुरू करण्यात आली असल्याची माहिती महाड नगरपालिकेचे स्वच्छता विभागाचे किशोर शिंदे यांनी दिली. हे काम युद्धपातळीवर सुरू असले तरी रोगराई पसरू नये याकरिता नागरिकांना देखील काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
महाडमध्ये पूर ओसरल्यानंतर सफाई करण्याचे आव्हान होते, मात्र नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी हे आव्हान लीलया पेलले असून शहरातील ८० टक्के सफाई झाली असून पिण्याच्या पाण्याचा पुरवठा देखील सुरळीत केला आहे. रोगराई पसरू नये म्हणून आरोग्य पथके कार्यरत करावी याबाबत तहसीलदार यांना पत्रव्यवहार केला आहे.
- जीवन पाटील, मुख्याधिकारी, महाड
सध्या पूरपरिस्थितीमुळे पाणी दूषित होण्याची शक्यता असते, यामुळे नागरिकांनी पाणी उकळून प्यावे. रस्त्यावर चिखल आणि माती आल्याने अशा ठिकाणी जाणे टाळले पाहिजे. जनावरांचे मलमूत्र पाण्यात मिसळून लेप्टोस्पायरोसिस सारखे आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याचबरोबर व्हायरल फिवर, मलेरिया, डेंग्यू हे आजारही उद्भवू शकतात. ज्यांच्या घरात पाणी शिरले त्यांनी घर स्वच्छ करून घेणे गरजेचे आहे. भाजीपाला, फळभाज्या स्वच्छ धुऊन घेणे गरजेचे आहे. अशा प्रकारे काळजी घेतली पाहिजे. - डॉ. दिगंबर गीते
स्वच्छता मोहीम युद्धपातळीवर सुरू
महाड : गेले काही दिवस महाड शहरात महापुरामुळे हाहाकार उडून नागरिकांचे आणि व्यापाºयांचे अतोनात नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यानंतर व्यापारी आणि नागरिकांनी भिजलेले साहित्य रस्त्यावर काढले आहे. तो कचरा उचलण्याचे काम नगरपालिकेने जेसीबी आणि सफाई कामगारांच्या मदतीने युद्धपातळीवर सुरू केले आहे.
गुरुवारी सकाळी ६ वाजल्यापासून शहरातील मुख्य बाजारपेठेतून ही स्वच्छता मोहीम सुरू करण्यात आली. जेसीबी, चार डम्पर, ४० ते ५० सफाई कामगार ही स्वच्छता करीत आहेत. ही स्वच्छता सुरू असताना, संपूर्ण पूरग्रस्त भागात नगराध्यक्षा स्नेहल जगताप या स्वत: फिरून कशा प्रकारे ही मोहीम सुरू आहे, त्यांना काही सूचना देत होत्या. त्यांच्या समवेत आरोग्य सभापती प्रमोद महाडिक, मुख्याधिकारी जीवन पाटील, नगर अभियंता सुहास कांबळे यांच्यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. या मोहिमेत कचरा उचलून झाला की, दुपारनंतर अग्निशमन दलाच्या फवाºयाने पाणी आणून रस्ते धुण्यात येत असल्याचेही मुख्याधिकारी पाटील यांनी सांगितले.
महापुरामध्ये प्रचंड प्रमाणात नुकसान होऊन, शहरात साचलेला कचरा पाहता, महाडमधील जमातूल मुस्लीम या संघटनेच्या वतीने खारकांड, पानसारी मोहल्ला, साळीवाडा नाका या परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या वेळी मौलाना मुझफर संगे, मेहबूब कडवेकर, आयुब चिचकर, अमीन अंतुले यांच्यासह सुमारे ६० ते ७० नागरिक सहभागी झाले होते.
महसूल विभागाकडून पंचनामे सुरू
पुरामध्ये शहरासह तालुक्यात झालेल्या नुकसानीचे महसूल विभागाकडून पंचनामे करण्यात येत असून, शासनाकडून पूरग्रस्तांना नक्की काय मिळणार याबाबत कुठलेही आदेश शासनाकडून आले नसल्याचे सांगितले जात आहे. याबाबत उलटसुलट चर्चा होत आहे. विमा कंपन्यांकडूनही महाडमधील पूरग्रस्त व नुकसानग्रस्त व्यापाºयांच्या तोंडाला पाने पुसली जाण्याची शक्यता आहे.
पुरानंतर माणगावमध्ये घाणीचे साम्राज्य; नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर
माणगाव : संपूर्ण माणगाव तालुक्यात गोरेगाव, इंदापूर, लोणेरे, मौर्बा, माणगाव शहरासह पावसाच्या पुराने थैमान घातले होते. सद्यपरिस्थितीत पाणी ओसरले असले तरी पुराच्या पाण्यासोबत कचरा त्याचबरोबर सावित्री नदीच्या पात्रातील रसायनमिश्रीत पाण्यामुळे घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या परिस्थितीत रोगराई लवकर पसरण्याची शक्यता आहे यावर मात करण्यास नगरपंचायतीसह ग्रामपंचायतीला कंबर कसावी लागणार आहे.
या पावसाने अनेक ठिकाणी कचरा, चिखल, प्लॅस्टिक कचरा जमा झाला आहे तरी त्या त्या ठिकाणच्या स्थानिक स्वराज्य संस्थांनी आपल्या कर्मचाºयाकडून सफाई करून घेणे गरजेचे आहे. यावर जिल्हा परिषद व पंचायत समितीने त्वरित आदेश देऊन रोगराई पसरविण्यास प्रतिबंध घालून योग्य ती उपाययोजना करणे गरजेचे आहे. अन्यथा रोगराईस सामोरे जावे लागेल. माणगाव शहरात माणगाव-दिघी पोर्ट रस्त्याचे काम सुरू आहे.
लागून असलेल्या रस्त्यांना मोरी टाकण्याच्या गटारामध्ये सिमेंटचे पाइप टाकण्यात आले असून मोजक्याच ठिकाणी पाइप टाकण्यात आले आहेत. काही ठिकाणी पाइप न टाकल्यामुळे पावसाचे या गटारातील पाणी खांदाड, सिद्धीनगर, मोर्बा रोड रहिवाशांच्या घरांमध्ये तसेच उपजिल्हा रुग्णालयात हे दूषित गटाराचे पाणी जात असल्यामुळे साथीच्या रोगांची भीती येथील नागरिकांना वाटू लागली आहे.पाण्याचा निचरा होण्यासाठी मार्ग ठेवला नाही.
त्यामुळे हे पाणी खड्ड्यामध्ये साचून डास उत्पत्ती होते व पाण्याला दुर्गंधी येत असते. माणगाव शहरातील गटाराचे पाणी कोणत्या ठिकाणी सोडायचे याचे नियोजन नसल्याने गटारे तुडुंब झाली की हे पाणी रस्त्यावर येत असते. याकडे माणगाव नगरपंचायतीचेही दुर्लक्ष होत असल्याचे जनतेकडून बोलले जात आहे. मोर्बा रोडवरील गटाराची पाइपलाइन उघडीच ठेवण्यात आली आहे. माणगाव शहर वगळता गोरेगाव, इंदापूर, मोर्बा, लोणेरे येथे ग्रामपंचायतींनी स्वच्छता करणे गरजेचे आहे.