वैद्यकीय अधिकाऱ्यांची सहा पदे रिक्त
By admin | Published: April 1, 2016 03:09 AM2016-04-01T03:09:30+5:302016-04-01T03:09:30+5:30
तालुक्यात ग्रामीण रुग्णालयासह सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच २७ उपकेंद्रांवर वैद्यकीय सेवा कार्यरत आहेत. तरी ग्रामीण रुग्णालयात दोन तर तालुक्यातील आरोग्य केंद्रात चार
- संदीप जाधव, महाड
तालुक्यात ग्रामीण रुग्णालयासह सहा प्राथमिक आरोग्य केंद्रे तसेच २७ उपकेंद्रांवर वैद्यकीय सेवा कार्यरत आहेत. तरी ग्रामीण रुग्णालयात दोन तर तालुक्यातील आरोग्य केंद्रात चार अशी सहा वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे गेल्या दीड वर्षापासून रिक्त आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर ताण येत आहे. तर ग्रामीण रुग्णालयात दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत आहे.
रस्ते अपघातांच्या संख्येतील वाढ, अपघातग्रस्तांवरील उपचार तसेच बाह्यरुग्ण, शस्त्रक्रिया करण्यासाठी सध्या ग्रामीण रुग्णालयात एकमेव वैद्यकीय अधिकारी असून वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या दोन जागा रिक्त आहेत. ग्रामीण रुग्णालयात दररोज सव्वाशे बाह्यरुग्ण तपासणी केली जात आहे, तर दरमहा सरासरी शंभर डिलीव्हरी केल्या जातात. अन्य शस्त्रक्रिया देखील दरमहा शंभराहून अधिक केल्या जातात. सर्व सुविधा उपलब्ध असल्या तरी एका वैद्यकीय अधिकाऱ्यावर मोठा ताण पडत आहे. या ठिकाणी रिक्त वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पदे, ३ परिचारिका, ३ शिपाई यांच्या जागा त्वरित भरल्यास अधिक चांगल्या पद्धतीने वैद्यकीय सुविधा देणे सहजशक्य होईल, असा विश्वास ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. भास्कर जगताप यांनी व्यक्त केला. येत्या काही दिवसात दोन वैद्यकीय अधिकारी रुजू होणार असल्याचे डॉ. जगताप यांनी सांगितले.
तालुक्यातील सहाही आरोग्य केंद्रामध्ये रुग्णवाहिका उपलब्ध आहेत. त्यामुळे अडचणीच्या काळात या रुग्णवाहिकांचा चांगला उपयोग परिसरातील रुग्णांना होत असतो. या सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात दररोज पाचशेहून अधिक बाह्यरुग्ण तपासणी केली जात आहे. यापैकी सर्वाधिक बाह्यरुग्ण तपासणी ही बिरवाडी आणि विन्हेरे आरोग्य केंद्रात केली जाते. विन्हेरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवाभावी संस्थेच्या सहकार्यातून रक्ततपासणीची अद्ययावत यंत्रणा सुरू केल्याचे डॉ. राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.
२७ उपकेंद्रांमध्ये ३५ पदे रिक्त
२७ उपकेंद्रांमध्ये तृतीय व चतुर्थ वर्गाची सुमारे ३५ पदे रिक्त आहेत. यात आरोग्य पर्यवेक्षक १, आरोग्य सहाय्यक पुरुष २, सहाय्यक महिला २, आरोग्य सेविका ६, आरोग्य सेवक ५, औषध निर्माता, कु ष्ठरोग तंत्रज्ञ ५, कनिष्ठ सहाय्यक २, शिपाई ६, सफाई कामगार ६ यांचा समावेश आहे.
ही रिक्त पदे भरण्यात यावी, याबाबतचे प्रस्ताव वरिष्ठांकडे पाठविण्यात आलेले आहेत. मात्र अस्तित्वात असलेल्या वैद्यकीय अधिकारी, आरोग्य कर्मचाऱ्यांकडून चांगली आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न केले जात असल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी सांगितले.
वर्षभरात आठ बालमृत्यू : तालुक्यात बालमृत्यूचे प्रमाण अत्यल्प आहे. वर्षभरात ८ बालमृत्यू झाल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र शिंदे यांनी दिली. गेल्या वर्षभरात महाड तालुक्यात १९९९ बालकांचा जन्म झाला असून यापैकी बिरवाडी (५१९), विन्हेरे (२८८), पाचाड (२८१), चिंभावे (२६२) दासगांव (४८५), आणि वरंध (१६४) यांचा समावेश आहे.