अलिबाग : गेली अनेक वर्ष रखडलेल्या सांबर कुंड धरणाच्या कामाला गती देण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला आहे. वन विभागाच्या अखत्यारीत रखडलेल्या प्रस्ताव बाबत मंत्रालयात वन मंत्री याच्याकडे १ नोव्हेंबर रोजी बैठक घेतली जाणार आहे. बैठकीनंतर राज्य शासनाकडे आलेला प्रस्ताव तातडीने दिल्लीला घेऊन जाण्याच्या सूचना पालकमंत्री उदय सामंत यांनी दिल्या आहेत. शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत सकारात्मक भूमिका पालकमंत्री उदय सामंत यांनी घेतली आहे. त्यामुळे सांबर कुंड धरण उभारणी दृष्टिक्षेपात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
अलिबाग तालुक्यातील अनेक वर्ष रखडलेल्या सांबर कुंड धरणाबाबत पालकमंत्री उदय सामंत याच्याकडे पत्रकारांनी पाठपुरावा केला होता. त्यानुसार आज जिल्हाधिकारी कार्यालयात राजस्व सभागृहात सांबर कुंड प्रश्नाबाबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक पालकमंत्री उदय सामंत याच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सांबर कुंड धरण बाबत रखडलेल्या प्रश्नाबाबत सकारात्मक चर्चा करून हा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न शासनाचा राहील असे पालकमंत्री सामंत यांनी म्हटले आहे. आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ किरण पाटील यासह अधिकारी वर्ग उपस्थित होते.
अलिबाग तालुक्यातील रामराज महान भागात सांबर कुंड धरण प्रस्तावित आहे. गेली साठ वर्षापासून हे धरण प्रलंबित आहे. त्यामुळे धरण कधी होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलेले आहे. धरणासाठी साडे चारशे एकर जमीन भुसंपदीत केली जाणार आहे. शेतकऱ्यांनीही धरण हवे आहे. मात्र वन विभागाची मंजुरी रखडल्याने आणि शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला हे अत्यल्प असल्याने धरण काम रखडले आहे. याबाबत वारंवार पाठपुरावा सुरू आहे. मात्र काम पुढे सरकले नाही.
उदय सामंत यांनी रायगडचे पालकमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारल्यानंतर सांबरकुंड धरण काम मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेतला आहे. वन विभागाच्या परवानगी साठी मंत्रालयात प्रस्ताव सादर केला असून केंद्राकडे पाठविला जाणार आहे. अशी माहिती कार्यकारी अभियता संजय जाधव यांनी पालकमंत्री यांना दिली. पालकमंत्री यांनी १ नोव्हेंबर रोजी वन मंत्री यांच्याकडे बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावू आणि प्रस्ताव त्वरित दिल्लीला घेऊन जा अशा सूचना अधिकारी याना दिल्या आहेत.
शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यास सकारात्मक विचारधरणात शेतकऱ्याच्या जमिनी जात आहेत. मात्र शेतकऱ्यांना मिळणारा मोबदला हा अत्यल्प असल्याने तो घेतला गेला नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्याबाबत सकारात्मक चर्चा या बैठकीत झाली आहे. याबाबत शेतकऱ्यांशी चर्चा करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना पालकमंत्री यांनी केल्या आहेत.
...तर धरणाचा खर्च हजार कोटीवर जाईल२००१ साली सांबर कुंड धरणाचे काम ५० कोटी मध्ये होणार होते. मात्र काम रखडल्याने आता २०२२ साली या धरणाचा बांधकाम खर्च साडे सातशे कोटींवर पोहचला आहे. दोन वर्ष अजून काम रखडले तर एक हजार कोटींवर जाईल अशी चिंताही पालकमंत्री उदय सामंत यांनी बोलून दाखवली आहे. त्यामुळे सांबर कुंड धरणाचे काम हे लवकरात लवकर सुरू होणे आवश्यक असल्याचेही पालकमंत्री यांनी म्हटले आहे.