टाटा रुग्णालय प्रशासनासोबत बैठक; खारघरमधील एक्ट्रेक्ट सेंटरमधील कामगारांचे मांडले प्रश्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 01:10 AM2020-12-04T01:10:28+5:302020-12-04T01:10:35+5:30
खारघरमधील टाटा रुग्णालयात जवळजवळ ४५० कामगार वेगवेगळ्या विभागांत कार्यरत आहेत. यामध्ये बहुतांशी कामगार कंत्राटी पद्धतीने आहेत.
पनवेल : खारघरमधील एक्ट्रेक्ट सेंटर (टाटा रुग्णालय) प्रशासनासोबत भारतीय कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी कामगारांच्या समस्यांसंदर्भात बैठक घेत सविस्तर चर्चा केली. कायमस्वरूपी व कंत्राटदार पद्धतीवर कार्यरत असलेल्या कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ही बैठक आयोजित करण्यात आली होती.
खारघरमधील टाटा रुग्णालयात जवळजवळ ४५० कामगार वेगवेगळ्या विभागांत कार्यरत आहेत. यामध्ये बहुतांशी कामगार कंत्राटी पद्धतीने आहेत. अशा कामगारांना कायमस्वरूपी करून घ्यावे, कोविड काळात केलेल्या कामांमध्ये कोविड भत्ता देण्यात यावा, कामगारांची पदोन्नती यासंदर्भात या बैठकीत चर्चा करण्यात आली. या वेळी भारतीय कामगार सेनेचे सरचिटणीस संतोष चाळके, तुकाराम बाळू गवळी, नंदकिशोर कासकर, कैलास म्हात्रे, मंगेश रानवडे, एकट्रेकचे संचालक डॉक्टर सुधीर गुप्ता, उपसंचालक डॉ. नवीन खत्री आदी उपस्थित होते. काम करीत असताना कामगारांना भेडसावणाऱ्या विविध अडचणी व मागण्यांबाबत सखोल चर्चा करण्यात आली. प्रशासनाने कंत्राटी कामगारांच्या मागण्या रास्त असल्याचे मान्य करून थोड्या दिवसांत त्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.