वाक्रूळ सरपंचपदी मेघना पाटील
By admin | Published: November 12, 2015 01:48 AM2015-11-12T01:48:15+5:302015-11-12T01:48:15+5:30
महिलांनी गावचा कारभार हाती घेणे ही मोठी बाब आहे. वाक्रूळ ग्रामपंचायतीमध्ये ११ जागी ११ महिला बिनविरोध निवडून आल्या.
पेण : महिलांनी गावचा कारभार हाती घेणे ही मोठी बाब आहे. वाक्रूळ ग्रामपंचायतीमध्ये ११ जागी ११ महिला बिनविरोध निवडून आल्या. निवडलेल्या त्या महिलांचा राज्यकारभार सोहळा मंगळवारी पार पडला. सरपंच पदावर मेघना पाटील यांची तर उपसरपंच पदावर रुपाली ठाकूर यांची बिनविरोध निवड झाली आहे. या दोन्ही पदासाठी एकमेव अर्ज आल्याने वाक्रू ळ सरपंच पदाची निवडणूक औपचारिकता ठरली होती.
वाक्रूळ ग्रामपंचायत कार्यालयात झालेल्या सरपंच निवडणूक प्रसंगी महिला सदस्यांमध्ये रेवती नाईक, मनिषा पाटील, हिरा लेंडी, राई पारधी, अंजना सुतार, शारदा शिद यांच्यासह समस्त वाक्रूळ ग्रामस्थ व गावचे मान्यवर उपस्थित होते. महिलांनाच ग्रामपंचायतीवर कारभार करण्याचा अधिकार दिल्याने गावच्या महिलांनीही या कार्यक्रमास मोठी संख्येने उपस्थित लावली.
कामार्ली सरपंचपदावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापू दळवी यांच्या स्रुषा नीता दळवी यांची बिनविरोध निवड झाली तर उपसरपंचपदावर वैजयंता मुसळे यांची बिनविरोध निवड झाली आहे. या सरपंच निवडणुकीत पिठासन अधिकारी एस. टी पाटील यांनी कामकाज पाहिले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य गंगू सवर, संजना यादव, श्रावण हिलम, सुरेश पवार, मिनाक्षी पाटील, उमेश लांगी, वनिता भस्मा, सपना मालुसरे व जनार्दन खंडागळे आदी मान्यवर उपस्थित होते.
आंबेघर ग्रामपंचायतीच्या सरपंचपदासाठी प्रियंका लंबाळे यांनी तुषार मानकवळे यांचा ६ विरुद्ध ३ मतांनी पराभव करीत सरपंच म्हणून निवडून आल्या तर उपसरपंच निवडणुकीत हरेश वीर यांनी अरुण गायकर यांचा ६ विरुद्ध ३ मतांनी पराभव करीत उपसरपंचपद पटकावले. या ठिकाणी पिठासन अधिकारी सी . आर. पाटील यांनी काम पाहिले. वरील तीनही ग्रामपंचायतीवर शेकापच्या महिला सरपंच व उपसरपंच निवडून आल्याने शेकाप कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी केली. (वार्ताहर)