- मधुकर ठाकूरउरण - देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात २५ सप्टेंबर १९३० रोजी झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहाला ऐतिहासिक महत्त्व आहे. शांततेच्या मार्गाने चाललेल्या आंदोलनकर्त्यांवर ब्रिटिश सरकारने बेछूट गोळीबार केला. यात आठ आंदोलनकर्त्यांना हौतात्म्य आले. स्वातंत्र्य संग्रामातील लढ्यात बलिदान दिलेल्या हुतात्म्यांचे आणि स्वातंत्र्यासाठी दिलेल्या लढ्याचे सर्वांनाच स्मरण व्हावे आणि हुतात्म्यांच्या स्मृती कायम तेवत राहाव्यात, यासाठी उरण परिसरात हुतात्म्यांच्या मूळ गावी सरकारने स्मारके उभारली आहेत. चिरनेर येथे दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी हुतात्म्यांना शासकीय इतबारे आदरांजली वाहिली जाते. मंगळवारी चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ८८ वा स्मृतिदिन संपन्न होणार आहे.स्वातंत्र्य संग्रामात सविनय कायदेभंग आंदोलनाअंतर्गत देशभरात आंदोलने सुरू होती. इंग्रज भारत छोडोचा नारा देत देशभरात आंदोलनाचा भडका उडाला होता. त्याच वेळी चिरनेर येथेही २५ सप्टेंबर १९३० मध्ये जंगल सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले होते. चिरनेर सत्याग्रह म्हणजे महाराष्ट्रातील १९३०-३३ च्या स्वातंत्र्य संग्रामातील एक महत्त्वाचे उपख्यान मानले जाते. शांततामय रीतीने सुरू असलेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहात शेतकरी,आगरी,आदिवासी असे सुमारे सहा हजार आंदोलक सहभागी झाले होते. यामध्ये २० ते २२ वयोगटातील तरुणांचा सहभाग मोठा होता. आक्कादेवीच्या डोंगराकडे निघालेल्या आंदोलनकर्त्यांवर ब्रिटिश पोलिसांनी निर्दयपणे बेछूट केला. गोळीबारात आठ हुतात्मे धारातीर्थी पडले, तर ३८ आंदोलक जखमी झाले. जखमी आंदोलकांना कायमचे अपंगत्व आले. म्हणूनच स्वातंत्र्य लढ्यातील चिरनेर जंगल सत्याग्रहाचा हा लढा देशभरात प्रसिद्ध आहे.माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, राजिप अध्यक्षा अदिती तटकरे, राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित केलेल्या कार्यक्र माप्रसंगी अतिथी म्हणून मावळचे खा. श्रीरंग बारणे, सिडको महामंडळ अध्यक्ष तथा आ. प्रशांत ठाकूर, आ. मनोहर भोईर, आ. जयंत पाटील, आ. बाळाराम पाटील, म्हाडाचे बाळासाहेब पाटील, माजी आ. विवेक पाटील, आ. अनिकेत तटकरे, उरण पंचायत समिती सभापती नरेश घरत, आस्वाद पाटील, प्रमोद पाटील, उमा मुंडे, नारायण डामसे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.सरकारने आठ हुताम्यांची स्मारकेमूळ गावांमध्ये उभारलीलढ्यात हौतात्म्य पत्करलेल्या धाकू गवत्या फोफेरकर, नवश्या महादेव कातकरी ( चिरनेर), रामा बामा कोळी (मोठी जुई ), हसुराम बुधाजी घरत (खोपटे), रघुनाथ मोरेश्वर न्हावी (कोप्रोली),परशुराम रामा पाटील (पाणदिवे), आनंदा माया पाटील (धाकटी जुई),आलू बेमट्या म्हात्रे (दिघोडे) या उरण तालुक्यातील आठ हुतात्म्यांची स्मारके शासनाने परिसरात त्यांच्याच मूळ गावी उभारली आहेत. अशा या ऐतिहासिक जंगल सत्याग्रहाचा स्मृतिदिन दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी चिरनेर येथे आयोजित केला जातो. यावेळी शासनाकडून बंदुकीच्या फैरी झाडून हुतात्म्यांना मानवंदनाही दिली जाते. येत्या २५ सप्टेंबर रोजीही चिरनेर जंगल सत्याग्रहाचा ८८ वा स्मृतिदिन साजरा केला जाणार आहे.
चिरनेर सत्याग्रहाचा आज स्मृतिदिन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 3:30 AM