संदीप जाधव ।महाड : मंगळवार, २ आॅगस्ट २०१६ आषाढी आमावस्येच्या काळरात्री ११.१५ वाजता, मुंबई-गोवा महामार्गावरील महाडजवळच्या सावित्री नदीवरील पूल अतिवृष्टीमुळे अचानक कोसळला आणि सर्वत्र हाहाकार माजला. कोकणवासीयांनाच नव्हे, तर संपूर्ण महाराष्टÑाला हादरवून सोडणाºया या दुर्घटनेमध्ये ४० निरपराध प्रवाशांचे बळी गेले होते. या दुर्घटनेला आज एक वर्ष होत असले, तरी ‘त्या’ काळीरात्रीच्या आठवणी आजही मनात आहेत. या दुर्घटनेत जयगड-मुंबई आणि राजापूर-मुंबई या दोन एसटी बसेस व एक तवेरा जीप अशी तीन वाहने प्रवाशांसह नदीच्या पात्रात वाहून गेली होती. तब्बल १४ दिवसांच्या शोधमोहिमेनंतर वाहून गेलेल्या ४० प्रवाशांपैकी २८ प्रवाशांचे मृतदेह व तीन वाहनांचा शोध घेण्यात प्रशासनाला यश आले होते. तत्कालीन प्रांताधिकारी सुषमा सातपुते व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे-पोळ या दोन महिला अधिकाºयांनी अहोरात्र मेहनत घेऊन राबवलेली यंत्रणा शोधमोहीम ही त्या वेळी त्या महिला अधिकाºयांच्या कौतुकास पात्र ठरली होती.या कोसळलेल्या पुलाच्या ठिकाणी अवघ्या १६५ दिवसांत नवीन पूल उभारण्याची कामगिरी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या राष्टÑीय महामार्ग विभागाने केली असली, तरी मृत्यूचा सापळा बनलेल्या या मुंबई-गोवा महामार्गावरील वाढत्या अपघातांमधील प्रवाशांच्या मृत्यूचे तांडव कधी थांबणार? अशी भीती प्रवाशांच्या मनात अद्यापही कायम असल्याचे दिसून येत आहे.२ आॅगस्टला रात्री दुर्घटना घडल्यानंतर दुसºया दिवशी पहाटेपासून बुडालेल्या प्रवाशांची शोधमोहीम सुरू करण्यात आली होती. यासाठी एनडीआरएफच्या ९० जवानांची फौज सलग १४ दिवस शोधकार्यात मग्न होती. दोन हेलिकॉप्टरसह सुमारे १५-२० बोटींच्या साहाय्याने पुलापासून सावित्री खाडीपर्यंत बेपत्ता प्रवाशांचा शोध सुरू होता. दुर्घटनेपासून शेकडो कि.मी. अंतरावर बेपत्ता प्रवाशांचे मृतदेह नदीच्या किनारी आढळून येत होते. काही मृतदेह तर श्रीवर्धन, हर्णे समुद्रकिनाºयावरही आढळून आले होते. घटनेनंतर १४व्या दिवशी वाहून गेलेल्या तीन वाहनांचा शोध घेण्यात प्रशासनाला यश आल्यानंतर ही शोधमोहीम थांबविण्यात आली होती. दुर्घटनेनंतर प्रशासनासह सेवाभावी संस्था, एमएमए अशा विविध संस्थांचे असंख्य हात मदतकार्यात गुंतले होते. त्या वेळी उभारण्यात आलेल्या मदतकेंद्रात मृत व बेपत्ता प्रवाशांच्या नातेवाइकांचा एकच आक्रोश पाहायला मिळत होता. मात्र, त्यांना तितक्याच धैर्याने प्रांताधिकारी सुषमा सातपुते, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे-पोळ या संतप्त नातेवाइकांच्या आक्रोशाला सामोरे जात, सांत्वन करीत त्यांना धीर देण्याचा प्रयत्न करीत होत्या.
‘त्या’ काळरात्रीच्या आठवणी वर्षानंतर आजही ताज्याच...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 02, 2017 2:32 AM