मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्र चक्रीवादळापासून अंधारात; आठ गावांतील रुग्णांचे हाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 07:28 AM2020-10-15T07:28:26+5:302020-10-15T07:28:31+5:30
रुग्णवाहिकेतून आणावे लागते पाणी
उदय कळस
म्हसळा : तालुक्यातील सर्वांत मोठ्या मेंदडी ग्रामपंचायत हद्दीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्ण सेवा शेवटची घटका मोजत आहे. या रुग्णालयात चक्रीवादळानंतर गेलेली वीज अद्याप आलेली नसून दवाखान्यात पाणी आणण्यासाठी कर्मचाऱ्यांना रुग्णवाहिका घेऊन वणवण फिरावे लागत आहे.
अधिकाऱ्यांच्या अनास्थेला बळी पडलेल्या म्हसळा तालुक्यातील मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्रात समस्यांचा डोंगर आहे. या आरोग्य केंद्रात निसर्ग चक्रीवादळानंतर गेलेली वीज अद्याप आलेली नसून वादळानंतर उडालेले पत्रेदेखील जैसे थे अवस्थेत आरोग्य केंद्राच्या आवारात पडलेले आहेत. आरोग्य केंद्रात पाण्याची कोणतीही सुविधा उपलब्ध नसल्याने कर्मचाऱ्यांना रुग्णवाहिका घेऊन पाणी आणण्यासाठी जावे लागत आहे, अशी दयनीय अवस्था आहे. आरोग्य केंद्रातील डॉक्टर आपल्या सोयीनुसार ये-जा करीत असल्याने मेंदडी, मेंदडी कोंड, मेंदडी आदिवासी वाडी, वारळ, रोहिणी, तुरुंबाडी, काळसुरी, आडी ठाकूर, गोंडघर, खाणलोशी या वाडी व गावांतील रुग्णांचे मोठ्या प्रमाणावर हाल होताना दिसत आहेत. मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्रात सुविधा उपलब्ध नसल्याने व रात्रीच्या वेळेस डॉक्टर उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना उपचारासाठी म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयात यावे लागत असून, आर्थिक भुर्दंडदेखील सहन करावा लागत आहे.
निसर्ग चक्रीवादळ आल्यानंतर मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्राचे पत्रे उडाले आहेत. पत्रे नसल्याने पावसाचे पाणी आत येऊन भिंती ओल्या झाल्याने वीज बोर्डात शॉर्ट सर्किट होत आहे. पत्रे दुरुस्तीसाठी मेंदडी, पाभरा व खामगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दुरुस्तीचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठविला आहे. - डॉ. गणेश कांबळे, तालुका वैद्यकीय अधिकारी