रायगडावर रंगणार मर्दानी खेळांच्या स्पर्धा; ४८ संघांनी केली नावनोंदणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2019 12:59 AM2019-05-18T00:59:05+5:302019-05-18T01:11:14+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात रंगणा-या अशा खेळांचा थरार देशातील शिवभक्तांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
- आविष्कार देसाई
अलिबाग : अस्सल मराठी मातीतल्या मर्दानी खेळांना राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळवून देण्यासाठी किल्ले रायगड शिवराज्याभिषेक समितीने पुढाकार घेतला आहे. येत्या ६ जून रोजी होणाऱ्या ३४६व्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्ताने होळीच्या माळावर इतिहासात प्रथमच मर्दानी खेळांच्या स्पर्धा पार पडणार आहेत. राज्यातील ४८ संघांना यासाठी पाचारण करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यकाळात रंगणा-या अशा खेळांचा थरार देशातील शिवभक्तांसाठी पर्वणीच ठरणार आहे.
रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला होता. ६ जून रोजी या घटनेला ३४६ वर्षे पूर्ण होत आहेत. नवीन पिढीला महाराजांच्या पराक्रमाची आठवण राहावी, त्यांच्या इतिहासापासून प्रेरणा मिळावी, यासाठी रायगडावर २००८ पासून शिवराज्याभिषेक सोहळा आयोजित करण्यास सुरुवात झाली. या वर्षी सोहळ्याचे वेगळेपण जपण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे, रायगड किल्ला शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे अध्यक्ष फत्तेसिंग सावंत यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
क्रिकेटसह अन्य खेळांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपये सहभागी खेळाडूंना मिळतात. मात्र, मातीतले मर्दानी खेळ, युद्धकला यांच्याकडे सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे. शिवाजी महाराजांनी आपल्या कार्यकाळात
या खेळांना राजाश्रय दिला होता. आज त्याची उपेक्षा होणे हे दुर्दैव असल्याची खंतही सावंत यांनी बोलून दाखविली.
पाच लाख शिवभक्त येण्याची शक्यता
शुक्रवारी जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी समितीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. सोहळ्याला तब्बल पाच लाख शिवभक्त येणार असल्याने, रायगड किल्ला आणि एकूणच जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्था कशी असावी, याबाबत विचारविनिमय झाला. त्याचप्रमाणे, महिलांच्या सुरक्षेला विशेष महत्त्व देण्यात आले. पाणी, आरोग्य सुविधा पुरविण्याबाबत प्रशासनाने लक्ष घालावे, अशी मागणी समितीमधील पदाधिकाºयांनी केली.
प्रशासनाकडून कोणतीच उणीव राहणार नसल्याचे जिल्हाधिकारी विजय सूर्यवंशी यांनी स्पष्ट केले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक अनिल पारसकर, निवासी उपजिल्हाधिकारी पद्मश्री बैनाडे, समितीचे पदाधिकारी अमर पाटील, पूनम पाटील-गायकवाड, निकिता म्हात्रे, श्रीकांत शिरोळे उपस्थित होते.
राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळविण्यासाठी प्रयत्न
मर्दानी खेळांना राष्ट्रीय खेळाचा दर्जा मिळावा, या खेळाकडे मोठ्या संख्येने युवक आकर्षित व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून सोहळ्याच्या दिवशी होळीच्या माळावर मर्दानी खेळाच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेमध्ये राज्यभरातील ४८ संघांनी नोंदणी केली आहे. स्पर्धेच्या ठिकाणी प्रत्येक संघ या खेळातील बारकावे, नावीन्याचे प्रदर्शन करणार आहेत. सोहळ्याला सुमारे पाच लाख शिवभक्त उपस्थित राहणार असल्याने, त्यांची कला देशाच्या कानाकोपºयात पोहोचणार असल्याकडेही सावंत यांनी लक्ष वेधले. स्पर्धेतील सर्व खेळाडूंना सन्मानचित्र देण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.