कामाच्या ताणामुळे बिघडतय मानसिक आरोग्य - डॉक्टर अनिल डोंगरे
By निखिल म्हात्रे | Published: October 10, 2023 07:30 PM2023-10-10T19:30:17+5:302023-10-10T19:31:50+5:30
आठ तास ड्युटीच्या वेळा ठरवून दिलेल्या असल्या तरीही आजही अनेक ठिकाणी पोलिसांना १२ तास ऑन ड्युटी राहावे लागते.
निखिल म्हात्रे, लोकमत न्युज नेटवर्क, अलिबाग - कामाचा ताण, वेगेवगळ्या कारणांमुळे लागणारे बंदोबस्त, जेवणाच्या वेळांना लागणारी कात्री यामुळे पोलिसांच्या प्रकृतीवर दुष्परिणाम होत आहेत. हे परिणाम केवळ शारीरिक स्वरूपाचे नसून सतत तणावग्रस्त अवस्थेत राहिल्यामुळे मानसिक अनारोग्याच्या तक्रारीही वाढत आहे. या तक्रारींकडे वेळीच लक्ष दिले नाही तर त्यातून आरोग्य अधिक बिघडत जाते, त्यामुळे कामाबरोबरच स्वताची काळजी घ्या असे अवाहन ज्येष्ठ माणसोपचार तज्ञ डॉक्टर अनिल डोंगरे यांनी पोलिस बांधवांना केले आहे.
जिल्हा सामान्य रुग्णालय अलिबाग रायगड जिल्हा रायगड पोलीस व माणुसकी प्रतिष्ठान सामाजिक संस्था रायगड यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मानसिक आरोग्य सप्ताह आणि आयुष्यमान भव शिबिराच्या आयोजन जंजिरा सभागृह पोलीस मुख्यालय अलिबाग रायगड येथे करण्यात आले होते. यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे, निवासी वैद्यकीय अधिकारी बाह्य संपर्क डाॅ अशिष मिश्रा, अतिरीक्त जिल्हा शल्य चिकीत्सक शितल जोशी, मानसोपचार तज्ज्ञ डाॅ. अर्चना सिंह, मानसशास्त्रज्ञ स्वप्निल भोपी आदी उपस्थित होते.
आठ तास ड्युटीच्या वेळा ठरवून दिलेल्या असल्या तरीही आजही अनेक ठिकाणी पोलिसांना १२ तास ऑन ड्युटी राहावे लागते. सार्वजनिक सण, समारंभ, मोर्चे, नेत्यांचे दौरे, शहरातील सुव्यवस्था राखण्याचा ताण पोलिसांवर येतो. वेळीअवेळी जेवण , पुरेशी झोप नसल्यामुळे पोलिसांमध्ये लठ्ठपणा वाढत आहे. या लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाब, मधुमेह या तक्रारींमध्येही वाढ झाली आहे. सतत उन्हात उभे राहिल्यामुळे डोकेदुखी बळावते. वेगवेगळ्या प्रकारची दुखणी मागे लागतात. त्यामुळे पोलिस बांधवानी स्वताची काळजी घेणे गरजेचे असल्याचे डाॅ. अनिल डोंगरे यांनी सांगितले.
मानसिक आजार आणि ताण-तणावाला बळी न पडता त्यावर उपचार घेण्यासाठी लोकांना प्रेरित करणे गरजेचे आहे. मागील तीस-पस्तीस वर्षांपूर्वी मानसिक आरोग्य विषयी असणारी अंधश्रद्धा आणि गैरसमजुती होत्या. आता त्यामध्ये प्रचार आणि प्रसार होत आहे. याबाबत अधिक प्रमाणात याची जनजागृतीची गरज आहे. रुग्णांसाठी जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार विभाग चांगले काम करत आहे. त्यांच्या अनेक उपक्रमांना नागरीकांनी उत्तम प्रतिसाद द्यावा असे आवाहन केले. - सोमनाथ घार्गे, जिल्हा पोलिस अधिक्षक.