अलिबाग :रायगड जिल्ह्यात केवळ नैराश्येपोटी १०८ जणांनी आपली जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला. ही बाब अतिशय गंभीर असून लोक आत्महत्या हे शेवटचे पाऊल का उचलत आहेत हा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यासाठी अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाने जागतिक आत्महत्या प्रतिबंध सप्ताहानिमित्त मानसिक आजार मुक्तीसाठी फलकांद्वारे जनजागृती व व्याख्यानांचे आयोजन केले आहे.
रायगड जिल्ह्यामध्ये सप्टेंबर २०२२ ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत १०८ जणांनी नैराश्यामुळे आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ञांमार्फत योग्य उपचार आणि समुपदेशन केले. त्यामुळे त्या १०८ जणांचे प्राण वाचवण्यात त्यांना यश आले. त्यात ४९ पुरुष व ५९ महिलांचा समावेश आहे.
गावागावांत जनजागृतीआत्महत्या रोखण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. १० ते १६ सप्टेंबर या कालावधीत आत्महत्या प्रतिबंध सप्ताह सुरू केला होता. सप्ताहाच्या निमित्ताने जिल्ह्यात जनजागृतीपर कार्यक्रम घेतले. आत्महत्या न करण्याचा संदेश वेगवेगळ्या फलकांमार्फत पोहचवण्याचा प्रयत्न केला आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील परिचारिकांद्वारे हा संदेश गावागावांत पोहचवण्यासाठी पुढाकार घेतला.
नैराश्या कशामुळेमोबाइलच्या जगतामध्ये नागरिक एकमेकांच्या जवळ आला असला, तरीही संवाद कमी झाला आहे. विभक्त कुटुंब पद्धतीमुळे व्यक्त होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे नैराश्यापोटी आत्महत्या करण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहेत.
१४४१६ नंबर ठरतोय वरदान
मानसिक आरोग्यसंबंधित मोफत मार्गदर्शन करण्यासाठी १४४१६ हा टोल फ्री क्रमांक सुरू केला आहे. मानसिक आजाराच्या आहारी जाणाऱ्यांना या क्रमांकामार्फत मार्गदर्शन करून त्यांची आत्महत्या रोखण्याचा प्रयत्न आहे. जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात ६० जणांचे समुपदेशन करून मानसिक संतुलन स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे हा क्रमांक मानसिक रुग्णांसाठी वरदान ठरत आहे.
बदलत्या राहणीमानामुळे मनमोकळेपणाने संवाद थांबले आहे. त्यामुळे मानसिक तणावातून आत्महत्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे. नैराश्य हा मानसिक आजार आहे. मनाने खचून न आता प्रत्येकाने संवाद साधला पाहिजे. - डॉ. अर्चना सिंह, मानसोपचार तज्ज्ञ.