पारा १८ अंशांवर; हुडहुडी भरलेले जिल्हावासीय शोधताहेत शेकोटीचा आधार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2024 01:17 PM2024-01-19T13:17:34+5:302024-01-19T13:17:45+5:30
दिवसाही वातावरण थंड असल्याने उबदार कपड्यांसह शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. जिल्ह्यात पडलेल्या थंडीमुळे रायगडकर सध्या गारव्याचा आस्वाद घेत आहेत.
अलिबाग : राज्यात तापमानाचा पारा घसरला असल्याने गेल्या चार दिवसांपासून वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. रायगड जिल्ह्यातही तापमानाचा पारा हा १८ अंशांवर आल्याने रायगडकरांना हुडहुडी भरली आहे. दिवसाही वातावरण थंड असल्याने उबदार कपड्यांसह शेकोटीचा आधार घ्यावा लागत आहे. जिल्ह्यात पडलेल्या थंडीमुळे रायगडकर सध्या गारव्याचा आस्वाद घेत आहेत.
जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून वातावरणात गारवा वाढल्याने रायगडकर थंडीने कुडकुडत आहेत. हवेत गार वारा वाहत असल्याने जिल्ह्यातील वातावरण गारेगार झाले आहे. त्यामुळे दिवसरात्र रायगडकर हे उबदार कपडे घालून थंडीपासून बचाव करीत आहेत. रात्रीच्या सुमारास थंडीचा कडाका वाढत असल्याने ठिकठिकाणी शेकोटी पेटवून नागरिक ऊब घेताना दिसत आहेत. सायंकाळनंतर पारा घसरत आहे. जिल्ह्यात कमाल तापमान हे २८, तर पहाटेच्या सुमारास पारा १८ ते १९ अंशांवर उतरत आहे. त्यामुळे रायगडकरांसह जिल्ह्यात पर्यटनासाठी आलेले पर्यटक थंडीचा आस्वाद घेत आहेत.
चार दिवसांपासून जोर वाढला
डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून जिल्ह्यात थंडी पडण्यास सुरुवात झाली होती; मात्र दिवसभर वातावरण गरम असले, तरी सायंकाळनंतर थंडी पडण्यास सुरुवात होत होती. त्यामुळे थंडीचा काही प्रमाणात आस्वाद रायगडकर घेत होते.
जानेवारीत या थंडीचा आस्वाद घेत असताना दुसऱ्या आठवड्यात थंडी गायब होऊन अवेळी पावसाचे आगमन झाले होते. त्यामुळे ऊन, पाऊस आणि काहीशी थंडी असे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे थंडी गायब होऊन उकाडा सुरू झाला होता; मात्र गेल्या चार दिवसांपासून जिल्ह्यातील पारा हा उतरण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उबदार कपडे दिवसभर घालण्याची वेळ रायगडकरांवर आली आहे.
गारवा कायम राहणार
चार दिवसांपासून गार वारे वाहत आहेत. त्यामुळे दिवसभर वातावरणात थंडावा जाणवत आहे. सायंकाळनंतर तर पारा खाली घसरतो.
थंडी अधिक पडली असल्याने दिवसाही शेकोट्या पेटवून थंडी घालविण्याचा प्रयत्न केला जात आहे. रात्रीच्या सुमारास ग्रामीण भागात तर हुडहुडी भरत असल्याने शेकोट्या पेटलेल्या दिसतात.
त्यामुळे रायगडकर सध्या पडलेल्या थंडीचा चांगलाच आस्वाद घेत आहेत. वातावरणात गारवा हा काही दिवस राहणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.