म्हसळा - म्हसळा शहरातील वाहतूककोंडी कमी करण्यासाठी तयार करण्यात आलेला बायपास हा दिघी पोर्टच्या अवजड वाहतुकीमुळे सध्या मृत्यूचा सापळा बनत चालला आहे. दिघी पोर्टच्या वाहनांची या बायपासवर दुतर्फा पार्किंग केल्याने या मार्गावरून जाणाऱ्या वाहनचालकांना अरुंद मार्गावरून जीव मुठीत घेऊन वाहने चालवावी लागत आहेत व यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.म्हसळा शहरात वाहतूककोंडीला पर्याय म्हणून काही वर्षांपूर्वी म्हसळा बायपास तयार करण्यात आला आहे. बायपास तयार केल्यानंतर काही वर्षातच दिघी पोर्टची अवजड वाहतूक या मार्गावरून सुरू झाली. सुरु वातीला ही अवजड वाहतूक कमी प्रमाणात होत होती, परंतु आज २५ ते २७ टन वजनाच्या पोलादी कॉइल, कोळसा यांची वाहतूक करणारे ट्रेलर, मोठाले डम्पर या मार्गावरून वाहतूक करू लागले आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर अवजड वाहनांचा व्याप वाढल्याने दिघी पोर्टजवळ ही वाहने उभी करण्यासाठी जागा कमी पडत असावी या कारणाने या अवजड वाहतूक करणाºया वाहन चालकांना म्हसळा येथे थांबण्याचा पर्याय निवडावा लागत आहे. त्यानुसार हे सर्व अवजड वाहतूक करणारे ट्रेलर, डम्पर म्हसळा बायपास जेथून सुरू होतो त्या एच.पी. पेट्रोल पंपापासून जवळजवळ ५०० मीटरपर्यंत रस्त्याच्या दुतर्फा दिवस-रात्र पार्किंग करीत असतात व १0 - १२ तासानंतर आपला नंबर आला की दिघी पोर्टकडे किंवा ज्या कंपनीत माल पोहचवायचा आहे तिथे जातात.दिवस-रात्र ही वाहने म्हसळा बायपासच्या दुतर्फा पार्क केल्याने या बायपासचा वापर करणाºया श्रीवर्धन, बोर्ली, बागमांडला, दिघीकडील प्रवासी वाहनांसहित दिवेआगर, हरिहरेश्वर येथे जाणाºया पर्यटकांना आपला जीव मुठीत घेऊन या मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. आधीच दिघी ते माणगाव मार्गाच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे, यामध्ये म्हसळा बायपासचादेखील समावेश आहे. त्यामुळे या मार्गावर गेल्या दोन-तीन दिवसांपासून पडलेल्या पावसाने चिखल झाल्याने बायपासवर गेल्या दोन दिवसांत ८ ते १० पर्यटकांच्या दुचाकी घसरून किरकोळ अपघात झाले आहेत. कित्येक चारचाकी वाहनांवरील वाहकाचा ताबा सुटताना अनेक नागरिकांनी पाहिले आहे त्यातच ही दुतर्फा लागलेली दिघी पोर्टची अवजड वाहने उभी असल्यामुळे या किरकोळ घटनांचे अनेक मोठ्या अपघातांमध्ये रूपांतर होण्यास वेळ लागणार नाही. त्यामुळे त्वरित ही दिघी पोर्टची अवजड वाहने म्हसळा बायपासवरून हटवावी, अशी मागणी म्हसळा शहरातील नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.म्हसळा बायपासवरून प्रवास करताना पावसामुळे झालेल्या या रस्त्यावरील चिखलाने अनेक दुचाकी, चारचाकी वाहने घसरून अपघात होता होता बचावले आहेत. त्यातच या दिघी पोर्टच्या दुतर्फा लागलेल्या ट्रेलरमुळे या मार्गावरून वाहन चालविणे धोकादायक बनले आहे. या दिघी पोर्टच्या वाहनांना या बायपासवरून त्वरित हटवावे.- सचिन करडे, अध्यक्ष गर्जा महाराष्ट्र प्रतिष्ठान, म्हसळादिघी पोर्टच्या या दुतर्फा पार्किंग करणाºया वाहनचालकांना म्हसळा बायपासवरून वाहनांना हटविण्यास सांगण्यात येईल व वारंवार बायपासवर वाहने पार्किंग करताना आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल.- सुदर्शन गायकवाड,सहायक पोलीस निरीक्षक, म्हसळा
म्हसळा बायपास मृत्यूचा सापळा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 4:20 AM