म्हसळ्याला अवकाळी पावसाने झोडपले
By admin | Published: May 31, 2017 06:15 AM2017-05-31T06:15:10+5:302017-05-31T06:15:10+5:30
शहरासह संपूर्ण तालुक्यात मंगळवारी अवकाळी पाऊस पडला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसळा : शहरासह संपूर्ण तालुक्यात मंगळवारी अवकाळी पाऊस पडला. उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला. मात्र अचानक आलेल्या पावसाने एसटी पकडण्यासाठी आलेल्या प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाल्याचेही चित्र म्हसळा स्थानकावर पाहावयास मिळाले. मंगळवारी शहरामध्ये वादळीवारा, विजेच्या कडकडाटासह मुसळधार पावसाला सुरवात झाली.
३४ लाखांचे सफाई कंत्राट संपल्याने म्हसळा नगरपंचायतीमार्फत यंदा गटारांची सफाई करण्यात आली नाही. यामुळे शहरातील बहुतांश गटारे तुंबलेल्या अवस्थेत दिसत होती. या गटारांमधून वाहणारे पाणी शहरातून जाणाऱ्या म्हसळा-बोर्ली या राज्यमार्गावर आल्याने काहीकाळ राज्यमार्ग पाण्याखाली गेले होते. पावसाबरोबर वादळी वारा आल्याने शहरातील डॉ.चोचे यांच्या इमारतीवरील भलामोठा पत्र्याचा शेड रहदारीच्या रस्त्यावर चाळीस फूट उंचीवरून खाली कोसळला. शेड पडलेल्या ठिकाणी काही काळ लहान मुले खेळत होती. मात्र पाऊस पडण्यास सुरवात झाल्याने ती मुले आपापल्या घरी गेल्याने मोठी जीवितहानी टळली. मात्र या पत्र्याने विद्युत वाहक तारा तुटून नुकसान झाले.
अचानक आलेल्या पावसामुळे बस प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. त्यांना भिजलेल्या अवस्थेतच बसमधून प्रवास करावा लागला. नागरिकांनी घरात पाणी घुसू नये म्हणून ताडपत्रीच्या दुकानात गर्दी केली होती. रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांमध्ये पाणी साचून छोटी छोटी डबकी तयार झाली होती. अशा रस्त्यावरून चालणे पादचारी आणि वाहनचालकांसाठी कठिण झाले होते. या अवकाळी पावसामुळे छत्री, रेनकोटच्या दुकानामध्ये खरेदीसाठी गर्दी के ली होती.
महाडमध्ये जनजीवन विस्कळीत
लोकमत न्यूज नेटवर्क
दासगाव : महाड तालुक्यात मंगळवारी आलेल्या अवकाळी पावसाने साऱ्यांची तारांबळ उडवली. अचानक आलेल्या या वादळी पावसामुळे संपूर्ण तालुक्याचे जनजीवन विस्कळीत झाले होते.
मे महिन्यामध्ये तापमानाचा पारा ४३ अंशाच्या वर गेला होता. नागरिक गरमीने हैराण झाले होते. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
ग्रामीण भागात तसेच शहरी भागात ठिकठिकाणी रस्त्यावर तसेच शेतांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलेले होते. हा पाऊस शेतीला लाभदायक ठरणार आहे. गेल्या महिनाभरात तापलेली जमीन आणि तरवे भाजणीनंतर करण्यात आलेल्या पेरणीला हा पाऊस लाभदायक ठरणार असून पेरे चांगले रुजणार अशी आशा शेतकऱ्यांना आहे. पेऱ्याला आवश्यक पाऊस पडल्याने बळीराजा अधिक शेतीच्या कामाला लागला आहे.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात खऱ्या अर्थाने पावसाला सुरुवात होते. पावसाच्या बचावासाठी रेनकोट, छत्री खरेदी, तसेच खेड्यापाड्यातील गटार सफाई हे सर्व जूनच्या सुरुवातीला करण्यात येते. अवकाळी पावसामुळे ठिकठिकाणी डबक्यामध्ये रस्त्यावर पाणी साचले तर मोठ्या प्रमाणात गटारे वाहू लागल्याने सफाई न झालेली गटारे सरळसरळ रस्त्यावरून ओलांडून वाहू लागली. याचा फटका नागरिकांना बसला. शेवटच्या टप्प्यात असताना वातावरणातील उष्णता आणि दमदार पावसामुळे आंबा नाशिवंत होणार आहे. यामुळे आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या मनात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.