म्हसळा ग्रामपंचायतीत निवडणुकीचे वारे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2018 02:27 AM2018-05-01T02:27:33+5:302018-05-01T02:27:33+5:30
तालुक्यातील एकूण ४० ग्रामपंचायत निवडणुकांपैकी बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची तारीख निश्चित झाल्याने तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे.
म्हसळा : तालुक्यातील एकूण ४० ग्रामपंचायत निवडणुकांपैकी बारा ग्रामपंचायतीच्या निवडणुकांची तारीख निश्चित झाल्याने तालुक्यात राजकीय वातावरण तापले आहे. ग्रामपंचायतीतील अस्तित्वासाठी प्रत्येक राजकीय पक्षाकडून मोर्चेबांधणी, प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे.
तालुक्यात सध्या राष्ट्रवादीच प्रबळ असून गेल्या काही महिन्यांपासून परिसरात सभा घेण्यात येत आहेत. आमदार सुनील तटकरे, अनिकेत तटकरे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे व अन्य कार्यकर्ते यांनी आपली ताकद पणाला लावली आहे, तर भाजपानेही पालकमंत्री यांच्या दौऱ्याने विकासकामाला वेग आणला आहे. ग्रामीण भागात भाजपाची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रस्ते, पाणी, वीज, मूलभूत सुविधा याकडे विशेष लक्ष दिले आहे. रायगड जिल्हा भाजपा उपाध्यक्ष कृष्णा कोबनाक यांनीही मोर्चेबांधणी सुरू केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विकास अजेंडा घेऊन या निवडणुका लढवणार असल्याचे समजते तर शिवसेना व काँग्रेस यांची युती असल्याने त्यांची ताकद देखील पणाला लागणार आहे. गतवेळी शिवसेनेला जास्त सरपंच प्राप्त झाले होते, तर ग्रामपंचायत सदस्य राष्ट्रवादीला प्राप्त झाले होते.
मे महिन्यात होणाºया बारा ग्रामपंचायतींमध्ये वरवठणे, चिखलप, भेकºयाचा कोंड, कुडगाव, कोलवट, ठाकरोली, पांगलोळी, नेवरूळ, घूम, सालविंडे, जांभूळ, आडी, महाड खाडी तर तुरु ंबाडी, खरसई, देवघर रेवली लिपनी वावे, फलसप या ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुका होत असून राजकीय पक्षांमध्ये चुरस वाढत आहे. सध्या वरवठणे, भेकाºयाचा कोंड, कोळवट, ठाकरोली, आडी महाड खाडी या ग्रामपंचायतीवर शिवसेनेची सत्ता आहे. तर चिखलप, कुडगाव, पांगलोळी, नेवरूळ, घूम, साळविंडे या ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. तर तालुक्यातील एकमेव जांभूळ ग्रामपंचायत शेतकरी कामगार पक्षाच्या ताब्यात आहे. पांगलोळी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता असून भविष्यात ही ग्रामपंचायत हिसकावून घेतली जाईल, असे काँग्रेसचे तालुका अध्यक्ष डॉ. मुईज शेख यांचे स्वप्न आहे.
आडी महाड खाडी ही ग्रामपंचायत गेली अनेक वर्षे शिवसेनेकडे असून इथे शिवसेनेत नाराजी पसरल्यामुळे याचा फायदा विरोधी पक्षाला होण्याची शक्यता आहे. शिवसेनेमध्ये अनेक वर्षे काम केलेले माजी तालुका प्रमुख समीर बनकर व विरोधी पक्षनेते बाळशेठ करडे यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. त्यामुळे नक्कीच शिवसेना पक्षाला आपली सारी ताकद पणाला लावावी लागणार आहे तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे नेते अली कौचाली यांना देखील आपली ग्रामपंचायत सहीसलामत ठेवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागणार आहे. तालुक्यात सध्या शिवसेना-काँग्रेस युती असल्याने पांगलोळी ग्रामपंचायत निवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. दुसरीकडे जांभूळ ग्रामपंचायत गेली २५ वर्षे शेकापकडे आहे. त्यामुळे जांभूळ ग्रामपंचायत यावेळी आपल्याकडे ठेवण्यात कोण यशस्वी होते, याकडे तालुक्याचे लक्ष लागून आहे.