म्हसळा : शहरातील नागरिकांच्या समस्या व तक्रारींकडे दुर्लक्ष करणाऱ्या व नेहमी कार्यालयात अनियमितपणे येणाऱ्या नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांचा शहरातील ग्रामस्थांनी गुरुवारी नगरपंचायतीमध्ये जाऊन निषेध नोंदवत कारवाईची मागणी केली आहे.
एक महिन्याआधी म्हसळा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी डॉ. जलाल यांच्या मालकीच्या इमारतीवर बेकायदेशीर मोबाइल टॉवर सुरू होता. या मोबाइल टॉवरचे परिणाम लक्षात घेता शहरातील नागरिकांनी म्हसळा नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांच्याकडे लेखी तक्रार केली होती. मात्र, शहरातील हातगाडीवाले व छोट्या-मोठ्या व्यावसायिकांना नेहमी त्रास देणाºया नगरपंचायतीने या टॉवरपासून नागरिकांच्या दैनंदिन होणाºया त्रासाकडे दुर्लक्ष करीत फक्त नोटिसा काढून कारवाई शिथिल केली. याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या ग्रामस्थांना कार्यालयीन वेळ सुरू होऊन तीन तास झाले असले, तरी मुख्याधिकारी उपस्थित दिसले नाहीत.
नागरिकांनी मुख्याधिकारी कुठे आहेत, विचारणा केली असता ते उशिराच येतात, असे सांगण्यात आले. नगरपंचायतीमध्ये कार्यालयाच्या वेळेत सलीम चौगले, जहुर हुर्झुक, शिवसेना शहरप्रमुख अनिकेत पानसरे, लियाकत धनसे, इमरान मुंगये, असलम चोगले, फहद पेनकर, इरफान घरटकर, सलीम फणसे आदी सकाळी ११ वाजल्यापासून ग्रामस्थ एक ते दीड तास मुख्याधिकाºयांची वाट पाहत बसले असतानाही, मुख्याधिकारी आले नाहीत.
या वेळी तक्रार घेऊन आलेल्या या ग्रामस्थांनी नगरपंचायतीचे गटनेते संजय कर्णिक यांच्याकडे मुख्याधिकाºयांचा जाहीर निषेध नोंदवत तेथून निघून गेले. यानंतर या ग्रामस्थांनी तहसीलदार गोसावी यांची भेट घेऊन जनतेच्या सेवेसाठी नियुक्ती करण्यात आलेल्या व कार्यालयात वेळेवर न पोहोचणाºया नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.
म्हसळा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारण्यात आलेला बेकायदेशीर मोबाइल टॉवर लवकर बंद न केल्यास येत्या काही दिवसांत नगरपंचायतीवर मोठा मोर्चा काढण्यात येईल. - सलीम चौगले, माजी सरपंच, म्हसळा