म्हसळा : म्हसळा तालुका क्रीडा संकुलाचे फेब्रुवारीमध्ये लोकार्पण म्हसळा तालुका क्रीडा संकुलाचे फेब्रुवारीमध्ये लोकार्पण होणार आहे. त्यासाठी आणखी २० लाखांची निधी मंजूर केल्याचे पालकमंत्री आदिती तटकरे यांनी शुक्रवारी सांगितले.
तालुक्यात क्रीडा संकुल, आयटीआय, ग्रामीण रुग्णालय असावे, याकरिता आघाडी शासनाच्या ध्येय धोरणानुसार सन १९१४-१५ मध्ये तत्कालीन पालकमंत्री, विद्यमान खासदार सुनील तटकरे यांनी म्हसळा तालुक्यात अद्ययावत क्रीडा संकुल तयार करण्यासाठी ६० लाख रुपये खर्चाचे बांधकामास मंजुरी दिली आणि म्हसळा सावर हद्दीतील शासकीय भूखंडावर प्रस्तावित संकुलाचे खासदार सुनील तटकरे यांनी भूमिपूजन करून कामाला सुरुवात केली होती. मागील ५ वर्षे शासकीय निधीअभावी म्हसळा क्रीडा संकुल बांधकामाचे काम रखडले होते. मात्र, आता कामाला गती मिळाली असून, हे क्रीडांगण सर्व त्या सोईनुसार परिपूर्ण व्हावे, म्हणून महाराष्ट्र राज्य क्रीडामंत्री, रायगड जिल्हा पालकमंत्री आदिती तटकरे यांनी या क्रीडा संकुलाचे वाढीव बांधकामास शासन स्तरावर आणखी २० लाख रुपये मंजूर केले असल्याचे सांगितले.
बांधकामाबाबत समाधानशुक्रवारी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या म्हसळा तालुका दौऱ्यावेळी त्यांनी शासकीय अधिकारी आणि तालुका पदाधिकारी यांच्यासमावेत क्रीडा संकुलाचे बांधकामाची पहाणी केली असता, संकुलाच्या होत असलेल्या बांधकामाबाबत समाधान व्यक्त करत, जानेवारी अखेरपर्यंत क्रीडा संकुलाचे काम पूर्ण करावे, अशा संबंधितांना सूचना करतानाच, फेब्रुवारीमध्ये म्हसळा तालुका क्रीडा संकुलाचे उद्घाटन करण्यात येईल, असे आश्वासन दिले.
आता या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आहे, त्यामुळे येत्या महिन्यात या संकुलाचे काम पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी त्यांचे समावेत तालुका अध्यक्ष समीर बनकर, सभापती उज्ज्वला सावंत, माजी सभापती नाझीम हसवारे, नगराध्यक्षा जयश्री कापरे, उपनगराध्यक्ष सुहेब हलदे, प्रांत अधिकारी समीर शेटगे, गटविकास अधिकारी वाय. एम.प्रभे, बांधकाम अभियंता एस.व्ही.गणगणे, तालुका क्रीडा अधिकारी वांजळे, उपअभियंता आर.टी.जेटे, शहर अध्यक्ष रियाज घराडे, भाई बोरकर, नासिर दळवी, नईम दळवी, मुबिन हुर्जुक आदी मान्यवर उपस्थित होते.