म्हसळा : कोलाड येथील लघु-पाटबंधारे विभागाच्या वतीने पाभरे धरणाच्या दुरु स्तीचे काम सुरू करण्यात आले आहे. आधीच पाणीटंचाई त्यात दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आल्याने म्हसळा तालुक्यातील दहा गावे आणि चार वाड्यांना तीव्र पाणीटंचाईस जामोरे जावे लागत आहे. या गावांतील सर्व योजना ठप्प झाल्या आहेत.पाणीटंचाईवर उपाययोजनांसाठी उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांच्या अध्यक्षतेखाली म्हसळा तहसील कार्यालयात शुक्रवारी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी तोंडसुरे प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजना अध्यक्ष महादेव चांगू पाटील, लघु-पाटबंधारे विभाग उपअभियंता एस. एस. शिंदे, उपअभियंता आर. व्ही. चितळकर, पोलीस उपनिरीक्षक पी. आय. कोल्हे, उपाध्यक्ष मनोज नाक्ती, सचिव सखाराम पवार आदी उपस्थित होते. या वेळी पाणीपुरवठा योजनेचे अध्यक्ष महादेव चांगू पाटील म्हणाले की, संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी योग्य नियोजन न केल्यामुळे आणि दुर्लक्षामुळे तालुक्यातील दहा गावे व चार वाड्यांवर तीव्र पाणीटंचाई भेडसावत आहे. हंडाभर पाण्यासाठी नागरिकांना भटकावे लागत आहे, त्यामुळे पाभरे धरणाची दुरुस्ती लवकरात लवकर करावी आणि तोपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा, त्वरित उपाययोजना न केल्यास आंदोलन करण्याचा इशाराही पाटील यांनी कमिटीमार्फत देण्यात आला, या वेळी नागरिकांची गैरसोय दूर करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन उपविभागीय अधिकारी प्रवीण पवार यांनी दिले.
म्हसळा तालुक्यात दहा गावे, चार वाड्या टंचाईग्रस्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 05, 2019 2:18 AM