महाड/बिरवाडी : महाड एमआयडीसी रस्त्यालगत असणाऱ्या टपऱ्या व अतिक्रमण हटविण्याची मोहीम महाराष्ट्र औद्योगिक विकास महाड मंडळ कार्यालयामार्फत शुक्रवारी ३ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता पोलीस बंदोबस्तात सुरू करण्यात आली, मात्र स्थानिक ग्रामस्थ व ग्रामपंचायत प्रशासन यांना याबाबत कोणतीही पूर्वसूचना न देता ही मोहीम सुरू केल्याने या मोहिमेला विरोध झाला.यानंतर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्यात स्थानिक ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी यांची तातडीची बैठक प्रभारी अधिकारी नंदकिशोर सस्ते यांच्या उपस्थितीत घेण्यात आली. याप्रसंगी उपतालुका प्रमुख राजू मांडे, ट्रक टेम्पो संघटना अध्यक्ष शरद मांडे, युवा सेनेचे दक्षिण रायगडचे सरचिटणीस अजित देशमुख, अमोल कारेकर माजी उपसभापती, बंडू देशमुख, शैलेश देशमुख आदींनी आपले विचार व्यक्त करून कारवाई चुकीची असल्याचे सांगत कारवाई स्थगित करण्याची मागणी केली.या कारवाईबाबत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे महाड येथील उपअभियंता शशिकांत गीते यांनी ही कारवाई वरिष्ठांच्या आदेशानुसार पोलीस बंदोबस्त घेऊन करण्यात येत आहे, मात्र ग्रामपंचायत व स्थानिक नागरिक यांनी घेतलेला आक्षेप वरिष्ठांना कळवून अतिक्र मण हटविण्याची कारवाई तांत्रिक बाबी पूर्ण करून पुन्हा सुरू करण्यात येईल असे स्पष्ट केले. महाड एमआयडीसीमधील रस्त्यालगत असणाऱ्या अतिक्र मणामुळे अपघात घडत असल्याने ही धडक मोहीम हाती घेण्यात आली आहे, असे सांगितले. तर महाड एमआयडीसी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी नंदकिशोर सस्ते यांनी महाड एमआयडीसीमधील अतिक्र मण हटाव मोहीम कायदेशीर असल्याचे सांगितले. (वार्ताहर)
एमआयडीसीत अतिक्र मण हटवले
By admin | Published: February 04, 2017 3:00 AM