एमआयडीसी रस्त्याची चाळण
By admin | Published: July 8, 2015 10:32 PM2015-07-08T22:32:48+5:302015-07-08T22:32:48+5:30
रोहा-कोलाड रस्त्यावरील धाटावनजीक जीर्ण अवस्थेत असलेल्या दोन मोऱ्यांचे काम नव्याने सुरू असल्यामुळे याला पर्याय म्हणून एमआयडीसीअंतर्गत रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे
धाटाव : रोहा-कोलाड रस्त्यावरील धाटावनजीक जीर्ण अवस्थेत असलेल्या दोन मोऱ्यांचे काम नव्याने सुरू असल्यामुळे याला पर्याय म्हणून एमआयडीसीअंतर्गत रस्त्यावरून वाहतूक वळविण्यात आली आहे. मात्र या रस्त्याला जागोजागी खड्डे पडल्याने एमआयडीसी रस्त्याची चाळण झाली आहे. अवघ्या दोन ते अडीच किमी अंतराचा वळसा घेत रोज प्रवास करावा लागत आहे. खड्डेमय रस्त्यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे. यामुळे पाठीच्या मणक्यासह विविध आजारांना आमंत्रण मिळत असल्याने प्रवासीवर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.
सतत वर्दळ सुरू असलेल्या रोहा-कोलाड रस्त्यावरून हजारो हलक्या व अवजड वाहनांची रहदारी रात्रंदिवस सुरू असते. कोकणाकडे लांब पल्ल्याच्या गाड्या या रस्त्यावरून जातात. पर्यटक येथूनच अलिबाग, मुरुडकडे जात असतात. तर रोहा व कोलाड बाजूकडे कॉलेजमध्ये जाणारे तरुण व शालेय विद्यार्थ्यांनाही याच रस्त्याचा वापर करावा लागतो. ग्रामीण भागाबरोबर शहरातून अनेक कामगार औद्योगिक वसाहतीत कामासाठी येत असल्याने सध्या रस्त्यावरील मोऱ्यांच्या सुरू असलेल्या कामामुळे धाटाव एमआयडीसी अंतर्गत रस्त्यावरून प्रवास करावा लागत आहे. मात्र रस्त्याची झालेली दुर्दशा सर्वच प्रवाशांना डोकेदुखी झाली आहे. वाहने खड्ड्यांत आदळल्याने अनेक अपघात झाल्याचे समजते.
रोहा सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता आर. टी. अहिरे म्हणाले की, रोहा-कोलाड रस्त्यावरील धाटाव पोलीस ठाण्याजवळील मोरीचे काम पूर्ण झाल्यामुळे तो वाहतुकीसाठी खुला केला आहे. जैनवाडी नजीकच्या मोरीचे काम प्रगतिपथावर आहे. काम झाल्यानंतर रस्ता वाहतुकीसाठी खुला केला जाईल. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, धाटावचे उपअभियंता पी. ए. पांचाळ यांनी धाटाव औद्योगिक वसाहतीतील अंतर्गत नवीन डांबरीकरण रस्त्याच्या कामाचा प्रस्ताव तयार असून तो वरिष्ठांकडे पाठवण्यात येणार असल्याचे सांगितले. (वार्ताहर)