मध्यरात्रीचा थरार... दोन शेतकऱ्यांचा जीव वाचवण्यासाठी त्यांनी केलं जिवाचं रान!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2018 05:12 PM2018-07-09T17:12:38+5:302018-07-09T17:21:27+5:30
मुंबईतून मध्यरात्री 2.30 वाजता फोन आला आणि अधिकाऱ्यांसह पोलिसांची झोप उडाली.
जयंत धुळप -
रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांना रविवारी मध्यरात्री अडीच वाजता फोन आला. दोन शेतकरी नदी पलिकडील शेतात अडकले असून पुराच्या पाण्यामुळे त्यांना घरी येता येत नाही. पाठक यांनी तात्काळ रोहा तहसिलदार सुरेश काशिद यांना फोन लावून याबाबत माहिती दिली. तहसिलदार काशिद यांनी क्षणाचाही विलंब न लावता रोहा पोलिसांना कळवले. तसेच कोलाड येथील वॉटर राफ्टींग इंन्स्टिट्यूटच्या बचाव पथकाचे प्रमुख महेश सानप यांनाही कळविण्यात आले. तहसिलदारांनी पोलिसांसह तर महेश सानप यांनी आपल्या रेस्कू बोटीसह घटनास्थळ गाठले. त्यानंतर सानप आपल्या 5 सहकाऱ्यांसह पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास नदी पलिकडे पोहोचले. त्या आपद्ग्रस्त शेतकऱ्यांना आपल्या बोटीत घेतले आणि पहाटे पाच वाजता नदी पार करुन दोघांचेही प्राण वाचविले.
रायगड जिल्हा आपत्ती निवारण नियंत्रण कक्षाच्या फोनवर रविवारी मध्यरात्री अडीच वाजता मुंबईत राहणाऱ्या किरण डबीर यांनी फोन केला. ‘माझे बाबा आणि काका नदी पलिकडच्या शेतात अडकले आहेत. नदीला पूर आलाय.. त्यांना शेतातून येता येत नाही.. त्यांना वाचवा..’ असा निरोप डबीर यांनी मुंबईतून दिला. त्यानंतर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी सागर पाठक यांनी, प्राप्त माहितीची खातरजमा करुन, दोघांना सुखरुप वाचविण्यासाठी तात्काळ नियोजन करुन रेस्क्यू ऑपरेशनसाठी पावले उचलली. भिकाजी डबीर व किशोर डबीर हे दोन भाऊ शेतात अडकले होते.
रोहा तालुक्यांतील नव्हे गावातील भिकाजी गोविंद डबीर व किशोर भिकाजी डबीर हे दोघे आपल्या दोन बैलांसह नदी पलिकडील खैराळे बेटावरील आपल्या शेतात लावणीच्या कामासाठी रविवारी सकाळी गेले होते. कुंडलिका नदी आणि तीची उप नदी यांमधील खैराळे बेटावर ही शेती आहे. सकाळी शेतावर जाताना या उप नदीस फारसे पाणी नव्हते. त्यामुळे ते आपल्या शेतावर गेले. रविवारी अकरा वाजण्याच्या सुमारास माझी आई जेवणाचा डब्बा देण्यासाठी गेली असता, उपनदीस पाणी वाढल्याने तिला पलिकडे जाता आले नाही. ती जेवण घेऊन घरीच परतली. तर संध्याकाळी पाऊस कमी होईल आणि उपनदीचे पाणी कमी होताच आपण घरी जाऊ असा विचार डबीर बंधुंनी केला. मात्र, नदीचे पाणी वाढतचं गेलं. त्यामुळे नदी पार करुन या दोन्ही भावांना येता आले नाही. ते दोघे घरी आले नाहीत म्हणून मला घरुन रात्री दोन वाजता फोन आला. मी लगेच अलिबागला आपत्ती निवारण कक्षाच्या फोनवर फोन करुन बाबा व काका अडकून पडल्याची माहिती दिल्याचे भिकाजी गोविंद डबीर यांचा मुंबईती राहणारा मुलगा किरण डबीर याने ‘लोकमत’शी बोलताना दिली.
एका फोनवर तात्काळ हलली सरकारी यंत्रणा
जिल्हा आपत्ती निवारण अधिकारी सागर पाठक यांनी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास मला फोन करुन याबाबत माहिती दिली. आम्ही तात्काळ रोहा पोलिसांना याबाबत माहिती दिली. रोहा पोलिसांची गाडी तात्काळ नाव्हे गावातील डबीर यांच्या घरी पोहोचली. प्राप्त माहिती खरी असल्याची खातरजमा करुन ते त्यांच्या काही नातेवाईकांसह खैराळे बेटा समोरील नदीकिनारी पोहोचले. तर कोलाड येथील वॉटर राफ्टींग इंन्स्टिट्यूटच्या बचाव पथकाचे प्रमुख महेश सानप यांनाही कळविण्यात आले होते. तात्काळ आम्ही आणि रेस्क्यू बोटीसह रेस्कू टिमचे प्रमुख महेश सानप घटनास्थळी पोहोचले. त्यावेळी पहाटेचे तीन वाजले होते, पहाटे तीन वाजता खळखळत्या प्रवाहातून रेस्क्यू बोटीने किनाऱ्यावर पोहचून दोघांचे प्राण वाचवले, अशी माहिती रोह्याचे तहसिलदार सुरेश काशिद यांनी दिली.
मोठ्या प्रकाश झोताच्या बॅटरीच्या प्रकाशात, भिकाजी गोविंद डबीर व किशोर भिकाजी डबीर हे दोघे आपल्या दोन बैलांसह नदी पलिकडील खैराळे बेटावरील शेतात आम्हाला दिसत होते. त्याच बॅटरीच्या प्रकाशात खळाळून वाहणारी नदी पार करुन पलिकडे जाण्याचा धाडसी निर्णय बचाव पथकाचे प्रमुख महेश सानप व त्यांच्या सहकाऱ्यांनी घेतला. बचाव पथक नदीपलिकडे गेले, त्यांनी भिकाजी गोविंद डबीर व किशोर भिकाजी डबीर या दोघांना आपल्या बोटीत घेतले आणि हेलकावणाऱ्या बोटीतून त्यांना किनाऱ्यावर आणले. त्यामुळे आम्हा सर्वाचा जीव भांड्यात पडल्याची रोमांचक सत्यकथा तहसिलदार काशिद यांनी सांगितले.
सर्वाच्या सुयोग्य आणि सत्वर समन्वयाचा परिणाम
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी पाठक यांच्यापासून सुरु झालेले हे रेस्कू ऑपरेशन, सर्वाचा सुयोग्य समन्वय, पोलिस आणि बचाव पथकाचे प्रमुख महेश सानप व त्यांच्या सहकाऱ्यांच्या धाडसामुळे यशस्वी झाले. या यशस्वी मोहिमेमुळे सर्वानाच मोठे समाधान लाभल्याचे काशिद यांनी शेवटी सांगितले.
आमच्यासाठी ते देवदूतच..
माझ्या बाबा आणि काकांना वाचविणारे हे आमच्यासाठी देवदूतच आहेत. त्यांचे उपकार आम्ही डबीर कुटुंबीय आयूष्यभर विसरू शकणार नाही, अशी भावूक प्रतिक्रिया किरण डबीर यांनी दिली.