अरुण जंगम म्हसळा : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ नुसार एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही. यासाठी हंगामी स्थलांतरित होऊन येणाऱ्या कुटुंबातील मुलांना त्या ठिकाणी जवळ असणाºया जिल्हा परिषद शाळेत दाखल करणे बंधनकारक आहे. त्यानुसार सर्वेक्षण करून तालुक्यात कामासाठी आलेल्या स्थलांतरित कामगारांची मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत, यासाठी म्हसळा तालुक्यातील ५० शाळाबाह्य विद्यार्थ्यांना जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करून घेण्यात आले आहेत.
म्हसळा तालुक्यात आॅक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यांत वीटभट्टीचे काम सुरू असते. या वीटभट्टीवर मोलमजुरीसाठी आदिवासी कुटुंबे स्थलांतरित होऊन येत असतात. त्यांच्या समवेत त्यांची सहा ते १४ वर्षे वयोगटाची बालकेही येतात. अशाच वीटभट्टीवर स्थलांतरित झालेल्या कुटुंबांचा खारगाव खुर्द, सावर, खरसाई मराठी, बनोटी, रेवली परिसरात सर्वेक्षण करण्यात आले. या सर्वेक्षणात काही कुटुंबे स्थलांतरित झालेली दिसून आली, ही गोष्ट लक्षात आल्यावर म्हसळा गटाचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी संतोष शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच केंद्रप्रमुख बीआरसीची टीम सलाम कौचाली, किशोर पैलकर, संदीप भोनकर, नंदकुमार जाधव, दीपक पाटील, उमेश गोराडे, अनिल बेडके यांनी सर्व वीटभट्टीवर भेट दिले. तेथे शाळाबाह्य मुलांच्या पालकांची भेट घेऊन त्यांच्या मुलांना नजीकच्या शाळेत दाखल करण्यासाठी तयार करण्यात आले. पालकांनीही आपल्या मुलांना शाळेत दाखल करून घेतल्याबद्दल समाधान व्यक्त केले.म्हसळा तालुक्यात वीटभट्टी, दगडखाण काम, रस्ता बांधकाम अशी अनेक कामे आॅक्टोबर ते एप्रिलपर्यंत चालू असतात, या कामासाठी राज्यांतील अनेक भागातून मोलमजुरीसाठी काही आदिवासी व अन्य कुटुंबे स्थलांतरित होत असून, त्यांच्याबरोबर त्यांचे पाल्यदेखील स्थलांतरित होतात आणि हे पाल्य दगड-माती, खड्डे, रस्ता किंवा इकडे-तिकडे फिरताना दिसून येतात.अशा मजूर कामगारांच्या मुलांच्या शिक्षणाची आबाळ होत असते, या मजूर तत्सम लोकांना आपल्या मुलांच्या शैक्षणिक नुकसानीचे तेवढे गांभीर्य अनेकदा नसते, यासाठी बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ नुसार एकही बालक शिक्षणापासून वंचित राहणार नाही, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत शासनाने कायदा केला असल्याचे गटशिक्षण अधिकारी शेडगे यांनी ‘लोकमत’ला सांगितले.म्हसळा तालुक्यातील खारगाव खुर्द, बनोटी, खरसई मराठी, देहेन (नर्सरी) अशा जिल्हा परिषद शाळेत एकूण ५० शाळाबाह्य विद्यार्थी दाखल करून घेण्यात आले आहेत. बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार त्यांना मिळवून दिला.तालुक्यात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार २००९ राबविताना, वीटभट्टी व अन्य कामाच्या ठिकाणी शिक्षक अशा मुलांचा शोध घेऊन स्थानिकांच्या सहकार्याने त्यांना त्वरित जवळच्या शाळेत दाखल करण्यात येते.- संतोष शेडगे, प्र. गटशिक्षण अधिकारी, म्हसळा