भूस्खलनाचा धोका जाणवल्यास जिल्ह्यातील गावांचे स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 04:12 AM2018-07-14T04:12:56+5:302018-07-14T04:13:12+5:30
भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने रायगड जिल्ह्यातील १०३ भूस्खलनग्रस्त गावांपैकी २० अतितीव्र धोका असलेल्या गावांत मुसळधार पावसामुळे सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, याची पाहणी केली आहे.
- जयंत धुळप
अलिबाग - भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने रायगड जिल्ह्यातील १०३ भूस्खलनग्रस्त गावांपैकी २० अतितीव्र धोका असलेल्या गावांत मुसळधार पावसामुळे सध्या नेमकी काय परिस्थिती आहे, याची पाहणी केली आहे. भूस्खलनाचा धोका जाणवल्यास गामस्थांचे स्थलांतरण करण्याकरिता रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आदेश दिले आहे. त्यानुसार २० अतितीव्र भूस्खलन धोका असलेल्या गावांत उप विभागीय महसूल अधिकारी यांच्या नेतृत्वाखालील तहसीलदार, मंडल अधिकारी, तलाठी अशा पथकांनी पाहणी केली आहे.
माती, गावांतील उतार, डोंगर कड्यांची भौगोलिक रचना, जलस्रोत, माती-जल परिणाम आदी वैज्ञानिक निकषांवर भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने हे सर्वेक्षण केले आहे. त्या निकषांमध्ये अतिवृष्टीमुळे कोणत्याही गावांस सद्यस्थितीत धोकादायक परिस्थिती निर्माण नसल्याचा निष्कर्ष पाहणी पथकाने केल्याची माहिती रायगड जिल्हा आपत्ती व्यवस्थापन
अधिकारी सागर पाठक यांनी दिली आहे.
जिल्ह्यातील १०३ भूस्खलन धोकाग्रस्त गावांमध्ये ५०० मि.मी. वा त्यापेक्षा अधिक सतत अतिवृष्टी झाल्यास भूस्खलनाचा धोका उद्भवू शकतो, असे अनुमान भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण संस्थेने नमूद केले आहे. परिणामी, या गावांतील पर्जन्यमानावर सतत लक्ष केंद्रित करण्यात आले आहे.
दहा गावांना मिळून एक पर्जन्यमापक यंत्र कार्यान्वित करण्यात आले आहे. त्यांच्या नोंदी सातत्याने घेण्यात येत आहेत.
यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंतच्या काळात या १०३ भूस्खलन धोकाग्रस्त गावांपैकी एकाही गावात ५०० मि.मी.पेक्षा अधिक पर्जन्यमान झालेले नसल्याने धोका उद्भवलेला नाही; परंतु आगामी काळात ५०० मि.मी.पेक्षा अधिक पर्जन्यमान झाल्यास संभाव्य धोक्यातून बचावासाठी तात्पुरते स्थलांतर करण्याचा पर्याय ग्रामस्थांनी मान्य केला आहे.
एक लाख ग्रामस्थांच्या स्थलांतराची व्यवस्था
तात्पुरत्या स्थलांतराकरिता आवश्यक सुरक्षित इमारतीची व्यवस्था प्रशासनाच्या माध्यमातून सज्ज ठेवण्यात आली आहे. या १०३ संभाव्य भूस्खलन धोकाग्रस्त गावांची एकूण लोकसंख्या सुमारे एक लाख असल्याचे पाठक यांनी अखेरीस सांगितले.