गांधारी नदीपात्रातील मगरीचे सावित्री नदीत स्थलांतर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 11:17 PM2019-03-11T23:17:17+5:302019-03-11T23:17:33+5:30
मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात महाडजवळील मोहोप्रे येथील गांधारी नदीवरील जुन्या पुलाशेजारी नवीन पुलाचे काम सुरू आहे.
महाड : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात महाडजवळील मोहोप्रे येथील गांधारी नदीवरील जुन्या पुलाशेजारी नवीन पुलाचे काम सुरू आहे. या कामाचेवेळी नदीच्या पात्रातील पिलरच्या उभारणीसाठी खणलेल्या खड्ड्यात नदीपात्रातील मगर घुसल्याने कामगारांमध्ये घबराट निर्माण झाली होती. वनखात्याच्या महाड विभाग आणि सिस्केप संस्था यांच्या सहकार्याने मगरीचे सुरक्षित स्थलांतर करण्यात आले आहे.
मगरींच्या आश्रयस्थानासाठी महाड येथील सावित्री आणि गांधारी या नद्यांची नवी ओळख निर्माण झाली आहे. सिस्केप संस्थेच्या प्रबोधनामुळे पात्रातून बाहेर आलेल्या अनेक मगरींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करणे सोपे होत आहे. सोमवारी महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामात मोहोप्रे जवळील गांधारी नदीवरील नवीन पुलाच्या कामामध्ये एक मगर दिसल्याने काम ठप्प झाले होते. वनखात्याशी संपर्क साधल्यानंतर सिस्केप संस्थेचे योगेश गुरव, प्रणव कुलकर्णी, मीत डाखवे, ओम शिंदे, अक्षय भोवरे, ओमकार वारणकर, नितीन कदम व इतर सदस्य हे घटनास्थळी पोहचले. यांच्यासोबत वनखात्याचे पी. डी. जाधव हेही होते. दोरखंडाच्या सहाय्याने मगरीचे तोंड बांधून तिला गोणीमध्ये बांधण्यात आले.त्यानंतर या मगरीला सावित्रीनदीत सुरक्षित सोडण्यात आले.
सिस्केपची मोहीम
सावित्री व गांधारी नदीच्या पात्रात महाड ते म्हसळा परिसरापर्र्यंत या गोड्या पाण्यातील मगरींची संख्या वाढत आहे. नदीच्या पात्राजवळील बंद असलेल्या दगडांच्या खाणीतील डबके, तलाव, शेततळी अशा पाणी असलेल्या ठिकाणी त्यांचे स्थलांतर होत असते. महाड ते म्हसळा तालुक्यात कुठेही अशा मगरी आढळून आल्यास महाडच्या सिस्केप संस्थेशी संपर्कसाधावा असे सिस्केप संस्थेचे प्रणव कुलकर्णी यांनी कळविले.