अलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये क्षयरोगाने मरण पावणाऱ्या रुग्णांची संख्या तीन टक्क्यांनी घटली असली तरी, उत्तर रायगडमध्ये स्थलांतरित क्षय रुग्णांमुळे रायगड जिल्ह्यावरील धोका हा कायम आहे. रुग्णांना शोधून रुग्ण बरा होईपर्यंत उपचार करणे हा त्यावरील एकमेव उपाय आहे. तसे झाले तरच क्षयमुक्त रायगडचे स्वप्न पूर्ण होईल, असे जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. सुरेश देवकर यांनी येथील पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट केले.४ मार्च रोजी जगभरामध्ये जागतिक क्षयरोग दिन साजरा केला जात आहे. ‘क्षयमुक्त जगासाठी शिलेदार होऊ या सारे मिळून नवा इतिहास घडवू या’ हे घोषवाक्य घेऊन १७ मार्चपासून क्षयरोग जनजागर सप्ताह जिल्ह्यामध्ये राबवण्यात येत आहे. जिल्हा क्षयरोगमुक्त राहण्यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसाहाय्याने २४ मार्च या जागतिक क्षयरोग दिनी मॅरेथान रॅली, विविध स्पर्धा यासह अन्य कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डॉ. देवकर यांनी दिली. जागतिक आरोग्य संघटनेच्या मानांकनानुसार एक लाख लोकसंख्येमागे १९४ व्यक्तींना क्षयरोग होतो. त्यानुसार रायगड जिल्ह्यामध्ये एक लाख लोकसंख्येमागे १४३ क्षयरोगाचे रुग्ण सापडतात. १९४ मधील ८५ टक्के रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आहे, तर रायगड जिल्ह्यामध्येही ते १४३ ला ८४ टक्के आहे. त्यामध्ये मृत्यू होण्याचे प्रमाण हे चार टक्क्यावर आले असले, तरी मृत्यूचे प्रमाण शून्य टक्क्यापर्यंत आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.९९ डॉट हे वेब पोर्टल सरकारने नुकतेच सुरु केले आहे. त्यामध्ये क्षयरोग झालेल्या नवीन रुग्णांची संख्या सुमारे ७५० आहे. त्या रुग्णांचे फोन नंबर त्याची माहिती या पोर्टलवर अपलोड केलेली आहे. त्याला उपचारासाठी ज्या गोळ्या दिल्या जातात त्या गोळ््या ठरावीक पध्दतीने खाल्ल्यानंतर रुग्णांनी टोल फ्री क्रमांकावर फोन करायचा आहे. त्याने औषध घेतल्याची नोंद त्या पोर्टलवर तातडीने होते. त्याचा डेटा कोठूनही पाहता येऊ शकतो. हे पोर्टल अतिशय चांगले असल्याचेही डॉ. देवकर यांनी सांगितले.क्षयरोगाने मृत्यू होण्याचे प्रमाण हे सात टक्के होते त्यामध्ये तीन टक्क्यांनी घट होऊन तो आकडा चार टक्क्यांवर आला आहे. परंतु पनवेल, उरण, कर्जत या तालुक्यांमध्ये विकासकामे झपाट्याने होत आहेत. त्यामुळे तेथे विविध कामानिमित्त येणाºयांची संख्या प्रचंड आहे. येथील स्थलांतरित रुग्णांची संख्या ही जिल्ह्यातील नागरिकांसाठी धोकादायक असल्याकडेही डॉ. देवकर यांनी लक्ष वेधले.
स्थलांतरित क्षय रुग्णांमुळे धोका कायम - सुरेश देवकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 2:52 AM