पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत मायलेकींना सुवर्ण; गतवर्षीही ज्योतिका यांना पदक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 03:57 AM2018-01-14T03:57:40+5:302018-01-14T03:57:49+5:30
दाबेलीची गाडी चालवून चरितार्थ चालवणा-या मायलेकींनी गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरावर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली. महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग असोसिएशन व सन्मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विक्रोळी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच राज्यस्तरीय ज्युनिअर, मास्टर महिला व पुरु ष पॉवर लिफ्टिंग आणि खुली बेंचप्रेस अजिंक्यपद स्पर्धा पार पडल्या.
- गिरीश गोरेगावकर
माणगाव : दाबेलीची गाडी चालवून चरितार्थ चालवणा-या मायलेकींनी गतवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरावर पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत सुवर्ण पदकांची कमाई केली. महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग असोसिएशन व सन्मित्र सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, विक्रोळी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच राज्यस्तरीय ज्युनिअर, मास्टर महिला व पुरु ष पॉवर लिफ्टिंग आणि खुली बेंचप्रेस अजिंक्यपद स्पर्धा पार पडल्या.
महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून प्रतिकूल परिस्थितीतही जिद्द ठेवून ती पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न करण्याची चिकाटी बाळगणाºया गोरेगावच्या ४८ वयाच्या ज्योतिका जयंत पाटेकर व त्यांची तेरावीत शिकणारी कन्या वैभवी या दोघी मायलेकींनी स्पर्धेत सुवर्णपदके पटकावली. ज्योतिका पाटेकर यांनी ६३ किलो वजनी गटात २२५ किलो वजन उचलून प्रथम येण्याचा मान मिळवला. तर त्यांची कन्या वैभवी हिने ५७ किलो वजनी गटात २३० किलो वजन उचलून प्रथम येण्याचा सन्मान प्राप्त केला. याशिवाय गोरेगावमधील दिनेश गोरीवले याने ५२ किलो वजनी गटात ९५ किलो बेंचप्रेसमध्ये सुवर्णपदक मिळविले. तर सनी साळवी यांस चौथ्या क्र मांकावर समाधान मानावे लागले. ज्योतिका आणि वैभवी यांची १९ जानेवारी ते २३ जानेवारी दरम्यान नागपूर येथे होणाºया राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
गतवर्षी याच हंगामातील जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर ज्योतिका पाटेकर यांनी सुवर्ण व रजत पदकांची कमाई करून जिल्ह्याचे नाव उंचावले होते. पाटेकर वयाच्या २७व्या वर्षांपासून जिम्नॅस्टिक खेळ प्रकारात कार्यरत होत्या. नव्वदीच्या दशकानंतर त्यांनी पॉवर लिफ्टिंग क्रीडा प्रकारात रस घेतला. त्यानंतर त्या पॉवर लिफ्टिंग प्रकारात स्वत:च्या मुलीचा व इतर हौशी स्पर्धकांचा सराव गोरेगावातील बाबासाहेब मराठे फिजिकल अॅकॅडमीत करून घेत आहेत.
रायगडमधील मुलींना या पॉवर लिफ्टिंग क्र ीडा प्रकारात तयार करून अधिकाधिक स्पर्धेतून यश संपादन करण्याचे त्यांचे स्वप्न आहे. पाटेकरांशी संवाद साधला असता, त्यांनी आपल्याला मिळालेल्या सुवर्णपदकापेक्षा आपल्या मुलीला प्रथमच मिळालेल्या सुवर्णपदकाने खूप आनंद झाला असल्याचे सांगितले. तर वैभवीने आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर यश संपादन करण्याचे आईचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण कामगिरी करणार असल्याचे सांगितले.