कोट्यवधींच्या जमिनी दुसऱ्यांच्या खिशात
By admin | Published: August 16, 2015 11:38 PM2015-08-16T23:38:37+5:302015-08-16T23:38:37+5:30
रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यासाठी हजारो हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जमिनींमधील गुंतवणूक
आविष्कार देसाई, अलिबाग
रायगड जिल्ह्यात मोठ्या संख्येने प्रकल्प प्रस्तावित आहेत. त्यासाठी हजारो हेक्टर जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जमिनींमधील गुंतवणूक ही अतिशय सुरक्षित आणि फायदेशीर समजली जाते. त्यामुळेच जमिनींचे दर गगनाला भिडले आहेत. सरकारच्या जमिनींवर अतिक्रमण करून काहींनी त्या आपापल्या खिशात घातल्या आहेत. त्याच जमिनी परत मिळविण्यासाठी लोकप्रतिनिधींनी आता कंबर कसली आहे.
रायगड जिल्हा परिषदेच्या ताब्यात असणाऱ्या जमिनींवर ज्यांनी अतिक्रमण केले आहे, याची जंत्री रायगड जिल्हा परिषदेच्या अर्थ व बांधकाम सभापती चित्रा पाटील यांनी काढण्यास सुरुवात केली आहे. यासाठी त्यांनी संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. गणेशोत्सव काहीच दिवसांवर आला आहे. जिल्ह्यातील रस्त्यांची दुरवस्था झाली असल्याने त्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा परिषदेच्या टिपणीस सभागृहात नुकत्याच एका बैठकीचे आयोजन केले होते.
मे. अध्यक्ष लोकल बोर्ड पेण, स्कूल बोर्ड, जिल्हा लोकल बोर्ड कुलाबा या जागा रायगड जिल्हा परिषदेच्या मालकीच्या आहेत. या जागांची व्याप्ती मोठ्या संख्येने असल्याने त्या जागेचा आजच्या बाजारभावाप्रमाणे हिशेब केल्यास तो कोट्यवधींच्या घरात जाऊ शकतो. या जमिनी पुन्हा जिल्हा परिषदेच्या नावावर करून घेण्यासाठी संबंधित तलाठ्यांची मदत त्या-त्या ग्रामसेवकांनी घ्यावी, अशी सूचना चित्रा पाटील यांनी केली.
या जमिनी पुन्हा जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्यास आवश्यक असणाऱ्या विकासकामांसाठी त्याचा वापर होऊ शकतो. त्या माध्यमातून लाखो रुपयांचे उत्पन्नही जिल्हा परिषदेला मिळू शकते. त्या जागांचा शोध घ्यावा, अशी सूचना पाटील यांनी केली आहे.