मिनीडोर संघटनेचे आमरण उपोषण
By admin | Published: April 12, 2016 12:46 AM2016-04-12T00:46:15+5:302016-04-12T00:46:15+5:30
खाडीपट्ट्यातील मुख्य रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे परिसरातील ग्रामस्थ तसेच वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी,
महाड : खाडीपट्ट्यातील मुख्य रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेमुळे परिसरातील ग्रामस्थ तसेच वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. या रस्त्यांची त्वरित दुरुस्ती करावी, या मागणीसाठी कोकण श्रमिक संघाच्या मिनीडोर चालक - मालक संघटनेतर्फे सोमवारपासून आमरण उपोषणाला सुरुवात झाली. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंता कार्यालयासमोर या संघटनेचे सदस्य तसेच पंचक्र ोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने या उपोषणाला बसले आहेत.
खाडीपट्ट्यातील तुडील फाटा ते म्हाप्रळ तुडील फाटा ते नरवणं शिरगाव फाटा ते तुडील फाटा वलंग रस्ता आदि प्रमुख रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे. या रस्त्यांची दुरुस्ती करावी या मागणीचे सार्वजनिक बांधकाम विभागाकडे मिनीडोर संघटनेतर्फे अनेक वेळा निवेदन देण्यात आली आहेत. मात्र त्याकडे संबंधित विभागाचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाल्याचा आरोप मिनीडोअर संघटनेचे फिरोज देशमुख, अध्यक्ष राजा बेर्डे यांनी यावेळी केला. यापूर्वी देखील या रस्त्याच्या दुरुस्ती व नूतनीकरणासाठी उपोषण करण्यात आले होते. त्याकडे दुर्लक्षच केले गेले. आपल्या मागण्या मान्य होईपर्यंत तसेच दुरुस्ती वा नूतनीकरणाबाबत योग्य निर्णय मिळेपर्यंत हे उपोषण सुरुच राहणार असल्याचे बेर्डे यांनी स्पष्ट केले.
या उपोषणाला जि. प. सदस्य इब्राहिम झमाने, संघटनेचे अध्यक्ष राजा बेर्डे, संदेश गोठल, राजन पाटणे, राकेश मनवे, इम्तीयाज झमाने, श्रीकृष्ण चव्हाण, सरपंच सुनील जाधव, सुनील गोरे आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच तुडील फाटा ते कुं बळे या एक महिन्यापूर्वी केलेल्या रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट झाल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम उपअभियंता एस. व्ही. पाटील यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा केली. (वार्ताहर)
लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे
खाडीपट्ट्यातील रस्त्यांच्या झालेल्या दुरवस्थेची डागडुजी तसेच नूतनीकरण १५ मे २०१६ पूर्वी केले जाईल, अशा प्रकारचे लेखी आश्वासन सा. बां. चे उपअभियंता एस. व्ही. पाटील यांनी मिनीडोर संघटनेला दिल्यानंतर सोमवारी सायंकाळी ७ वा. मिनीडोर संघटनेने सुरू केलेले आमरण उपोषण मागे घेण्यात आले.
उपअभियंता पाटील यांच्या समवेत झालेल्या चर्चेप्रसंगी जि. प. सदस्य इब्राहिम झमाने, सामाजिक कार्यकर्ते अल्फला देशमुख, मिनीडोर संघटनेचे अध्यक्ष राजेश बेर्डे, फिरोज देशमुख आदी पदाधिकारी तसेच खाडीपट्ट्यातील कार्यकर्ते उपस्थित होते. उपअभियंता एस. व्ही. पाटील हे मिनीडोरमध्ये बसून या खाडीपट्ट्यातील रस्त्यांची पाहणी करण्यासाठी गेले होते.