मंत्रीपद मिळाले मात्र गीते यांनी फक्त बनवाबनवी केली
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2019 03:33 AM2019-04-03T03:33:11+5:302019-04-03T03:34:03+5:30
सुनील तटकरे : आबलोली येथील जाहीर सभा
आबलोली : सरकारमध्ये मंत्रिपदे मिळाली. मात्र, नाकर्त्या अनंत गीतेंनी केवळ बनवाबनवी करण्याचे काम केले. स्वत:चा नाकर्तेपणा लपवण्यासाठी माझ्यावर बेछूट आरोप ते करत आहेत. मात्र, माझ्यावरील कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. माझ्यावर कोणत्याही गुन्ह्याची नोंद नाही याची जाणीव गीतेंना असणे गरजेचे आहे. स्वत:च्या मतदार संघात नाव नसणारा खासदार आपल्या मतदारसंघाशी काय नाळ जोडणार? आता देशात आणि रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातसुद्धा बदलाचे वारे वाहात असून परिवर्तन अटळ आहे, असे प्रतिपादन रायगड-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेकाप, आरपीआय (कवाडे) गटाचे उमेदवार सुनील तटकरे यांनी केले.
गुहागर तालुक्यातील पडवे गटातील आबलोली बाजारपेठेतील जाहीर सभेत ते बोलत होते. या वेळी त्यांनी मेक इन इंडिया, अच्छे दिन, पंतप्रधानांच्या घोषणा, युतीचे उमेदवार आयातीचे धोरण यावर सडकून टीका केली. सभेसाठी उपस्थितांची गर्दी पाहून सुनील तटकरे यांनी भास्कर जाधवांवरील प्रेमापोटी जनता भरउन्हात उपस्थित असल्याचे आवर्जून नमूद केले. यावेळी आमदार भास्कर जाधव यांनी अनंत गीते, रवींद्र वायकर यांचा खरपूस समाचार घेतला. देवघर येथील टेक्सटाइल उद्योगाला विरोध करणारे जहाजतोडणी उद्योग आणतात, एच एनर्जीकडून शेतकऱ्यांना मिळणारा जमीन मोबदला लुबाडतात त्यांना धडा शिकवण्याची वेळ आली आहे. अनंत गीतेंनी कोणतेच भरीव काम केले नाही. आमच्या कोणत्याही जिल्हा परिषद सदस्याने केलेले काम गीतेंपेक्षा सरस ठरेल, असा दावा जाधव यांनी केला. आम्ही मंजूर केलेल्या कामांची भूमिपूजने पालकमंत्री करीत आहेत., त्यामुळे खऱ्या विकासकामांच्या पूर्ततेसाठी आणि सामान्य जनतेच्या हक्कांसाठी सुनील तटकरे यांना निवडून देऊ आणि त्यात गुहागर विधानसभा मतदारसंघाचा भरीव वाटा असेल, असे आश्वासन आ. भास्कर जाधव यांनी दिले.
यावेळी सरचिटणीस शेखर निकम, जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, जिल्हा परिषद विरोधी पक्षनेते विक्रांत जाधव, तालुकाध्यक्ष विनायक मुळे, काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रदीप बेंडल, सुरेश कातकर, पद्माकर आरेकर, महामूद पालेकर, सभापती पूनम पाष्टे, उपसभापती पांडुरंग कापले, जिल्हा परिषद सदस्य प्रवीण ओक, नेत्रा ठाकूर, पंचायत समिती सदस्य विभावरी मुळे, सीताराम ठोंबरे आदी मान्यवर उपस्थित होते.