ऐतिहासिक महाडमध्ये भीमसृष्टी उभारणार, मंत्री संजय शिरसाट यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2025 13:47 IST2025-03-21T13:46:52+5:302025-03-21T13:47:08+5:30

चवदार तळे सत्याग्रहाचा वर्धापन दिन सोहळा उत्साहात...

Minister Sanjay Shirsat announces that Bhima Srushti will be established in historical Mahad | ऐतिहासिक महाडमध्ये भीमसृष्टी उभारणार, मंत्री संजय शिरसाट यांची घोषणा

ऐतिहासिक महाडमध्ये भीमसृष्टी उभारणार, मंत्री संजय शिरसाट यांची घोषणा

अलिबाग/महाड : ऐतिहासिक महाडमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याची माहिती देणारी भीमसृष्टी उभारण्यात येईल. यासाठी लागणारा निधी सरकार उपलब्ध करून देईल, अशी घोषणा सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी गुरुवारी केली. 

चवदार तळे सत्याग्रहाच्या ९८ व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी रोजगार हमी मंत्री भरत गोगावले, सामाजिक न्याय विभागाचे सचिव हर्षदीप कांबळे, रिपब्लिकन सेनेचे आनंदराज आंबेडकर, जिल्हाधिकारी किशन जावळे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड, जिल्हा पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे, डॉ. भदंत राहुल बोधी, समाज कल्याण अधिकारी सुनील जाधव, नागसेन कांबळे, आदी उपस्थित होते. 

अबू आझमी यांनी काढली इन्साफ यात्रा
चवदार तळे सत्याग्रह स्मृतिदिन कार्यक्रमाला पहिल्यांदाच समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी हजेरी लावली. त्यांनी मुंबई ते महाड अशी इन्साफ यात्रा काढली. यावेळी त्यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी आलो आहे, असे सांगून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामुळेच आपण सुरक्षित आहोत असे स्पष्ट केले.  

लाखो अनुयायी उपस्थित
सोहळ्यासाठी राज्यभरातून लाखो अनुयायी महाडमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी मान्यवरांनी क्रांतिस्तंभ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक येथे भेट देऊन अभिवादन केले. रायगड पाेलिस दलाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना सशस्त्र मानवंदना दिली. त्यानंतर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

चवदार तळे सुशोभीकरणासाठी यापूर्वीच घोषित झालेली सात कोटींची विकासकामे सुरू आहेत. राजर्षी शाहू महाराज स्मारकाच्या तीन कोटींची कामे तातडीने सुरू केली जातील,  असेही शिरसाट यांनी सांगितले. 
मंत्री भरत गोगावले यांनी सांगितले, चवदार तळे सत्याग्रहाच्या शतकपूर्ती वर्धापनदिनासंदर्भात मंत्रिमंडळाच्या उच्चस्तरीय बैठकीत कार्यक्रमाची निश्चिती करण्यात येईल.  

Web Title: Minister Sanjay Shirsat announces that Bhima Srushti will be established in historical Mahad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.