नेरळ : शतकमहोत्सव साजरा करणाऱ्या माथेरानच्या मिनीट्रेनचे सुरुवातीच्या काळात चालविले जाणारे इंजिन नेरळ स्थानकात प्रदर्शनार्थ ठेवण्यात आले आहे. त्या वाफेवर चालविल्या गेलेल्या इंजिनाला नवीन साज देण्यात आला आहे.
नेरळ-माथेरान-नेरळ ही घाटमार्गावर चालविली जाणारी मिनीट्रेन १९०७ मध्ये चालविण्यास सुरुवात झाली. या मिनीट्रेनसाठी त्या वेळी जर्मनीमधून कोळशापासून तयार होणाºया वाफेवर चालणारी चार इंजिने आणण्यात आली होती. १९८० पर्यंत नेरळ-माथेरान-नेरळ अशी सेवा देणाºया त्या चारपैकी तीन इंजिनांना रेल्वे प्रशासनाने प्रदर्शनार्थ ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यातील एनडीएम ७९३ बी हे इंजिन नवी दिल्ली येथील रेल भवन बाहेर उभे करण्यात आले आहे. तर एनडीएम ७३९ बी हे इंजिन माथेरान रेल्वेस्थानकात पर्यटकांसाठी कायमस्वरूपी प्रदर्शनीय म्हणून ठेवण्यात आले आहे. एनडीएम ७९४ बी हे इंजिन नेरळ रेल्वेस्थानकात प्रदर्शनार्थ ठेवण्यात आले आहे, तर एनडीएम ७३८ बी हे इंजिन रेल्वे अभियंता यांनी डिझेलमध्ये रूपांतरित करून आजही वापरात ठेवले असून, मध्य रेल्वेच्या काही खास फेºयांसाठी ते इंजिन मिनीट्रेनसाठी लावण्यात येते. नेरळ रेल्वेस्थानकात प्रदर्शनार्थ उभे करून ठेवण्यात आलेल्या एनडीएम ७९४ या इंजिनाला नवीन साज देण्याचे काम मध्य रेल्वेने केले आहे. या इंजिनाला निळा रंगाने नव्याने रंगविण्यात आले असून, रात्रीदेखील पर्यटक आणि प्रवासी यांचे लक्ष केंद्रित व्हावे, यासाठी त्या इंजिनाला एलईडी लाइट्स लावले आहेत.परिसर झाला हिरवागारच्नेरळ रेल्वेस्थानकात प्रदर्शनार्थ उभे करून ठेवण्यात आलेल्या इंजिन भोवतीच्या परिसरात झाडे लावून येथे बगिचा तयार करण्यात आला आहे. हिरवागार झालेल्या या परिसराला शोभा आली असून हे इंजिन गेल्या काही दिवसांपासून पर्यटक आणि प्रवासी यांच्यासाठी सेल्फी पॉइंट बनले आहे.