मुकुंद रांजणे लोकमत न्यूज नेटवर्कमाथेरान : माथेरान या थंड हवेच्या ठिकाणी प्रामुख्याने एप्रिल आणि मे महिन्यात हजारोंच्या संख्येने पर्यटक येत असतात. या पर्यटकांच्या दिमतीला असलेली नेरळ-माथेरान मिनीट्रेन यावर्षी बंद असल्याने अनेकांचे रोजगार हिरावले आहेत. त्यात जंगलातील रानमेवा पर्यटकांना विकणाऱ्या आदिवासींचा रोजगार मिनीट्रेन बंद असल्याने हिरावला आहे. जुम्मापट्टी भागातील शेकडो आदिवासी विद्यार्थी आणि त्यांच्या माता रानमेवा विकण्यासाठी चार किलोमीटरची पायपीट करून माथेरान गाठत आहेत. मात्र माथेरान मिनीट्रेनच बंद असल्याने रानमेवा विकून शाळेची वह्या, पुस्तके, दप्तर,कपडे विकत घेण्यासाठी काही पैसे गोळा करण्याचा आदिवासी विद्यार्थ्यांचा प्रयत्न अपुरा ठरत आहे.नेरळ-माथेरान मिनीट्रेन आपला शतक महोत्सव साजरा करून पर्यटकांच्या सेवेत आहे. या मिनीट्रेनचा नेरळ-माथेरान हा २१ किलोमीटर लांबीचा प्रवास या घाटातील आदिवासी लोकांचे रोजगाराचे प्रमुख साधन होते. कारण वर्षातील आठ महिने मिनीट्रेनच्या मार्गातील जुम्मापट्टी आणि वॉटरपाइप या स्थानकात ज्या स्थानिक वस्तू, जंगलातील रानमेवा प्रवाशांना मिळायचा त्या सर्व वस्तू स्थानिक आदिवासी लोक पर्यटक प्रवाशांना विकून आपल्या कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्यात हातभार लावत. उन्हाळ्यातील दोन महिने तर माथेरान मिनीट्रेनसाठी पर्यटन हंगाम असल्याने मिनीट्रेनच्या सर्व फेऱ्या या गर्दीच्या असत. त्या गाडीतून प्रवास करणाऱ्या पर्यटकांना माथेरानच्या डोंगरातील रानमेवा विकून आदिवासी विद्यार्थी हे पुढील शैक्षणिक वर्षासाठी वह्या, पुस्तके, कपडे, दप्तर, आदी साहित्य खरेदी करण्यासाठी आपल्या आईबरोबर प्रामुख्याने जुम्मापट्टी आणि वॉटरपाइप रेल्वे स्टेशनमध्ये व्यवसाय करताना दिसायचे. या दोन्ही स्थानकात जुम्मापट्टी, माणगाववाडी, धनगरवाडा, धसवाडी, कोंबळवाडी, बेकरेवाडी, आसलवाडी, मण्याचामाळ, नाण्याच्यामाळ येथील आदिवासी विद्यार्थी मिनीट्रेनमधून प्रवास करणाऱ्या पर्यटक प्रवाशांना जंगलातील रानमेव्याची भेट द्यायचे. या भागातील आदिवासी विद्यार्थ्यांचा हा अनेक वर्षे उन्हाळ्याच्या सुटीत चाललेला व्यवसाय असायचा. यावर्षी या सर्व विद्यार्थ्यांना मिनीट्रेन बंद असल्याने जुम्मापट्टी आणि वॉटरपाइप ऐवजी थेट अमन लॉज तसेच माथेरान गाठावे लागत आहेत. त्यासाठी सकाळी लवकर उठून घरापासून ७ ते १० किलोमीटरचा पल्ला गाठत माथेरानचा दस्तुरी नाका गाठावा लागतो. त्यापुढे अमन लॉज या रस्त्याच्या कडेला अनेक आदिवासी लहान मुले-मुली रानमेवा विकत बसलेल्या दिसून येतात.
मिनीट्रेन बंदचा आदिवासींना फटका
By admin | Published: May 14, 2017 10:53 PM