मिनीट्रेनचे रडगाणे सुरूच, इंजिन पडले बंद; पर्यटकांचा खोळंबा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 02:19 AM2019-05-10T02:19:21+5:302019-05-10T02:23:26+5:30
सध्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे. मात्र, माथेरान येथे जाण्यास असलेल्या मिनीट्रेनचे प्रवास सुरळीत न ठेवण्याचे रडगाणे सुरूच आहे.
नेरळ : सध्या थंड हवेच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढलेली आहे. मात्र, माथेरान येथे जाण्यास असलेल्या मिनीट्रेनचे प्रवास सुरळीत न ठेवण्याचे रडगाणे सुरूच आहे. बुधवारी नेरळ येथून निघालेल्या मिनीट्रेनचे इंजिन मध्येच बंद पडले आणि प्रवासी पर्यटकांचा खोळंबा झाला.
नेरळ येथून माथेरानकरिता जाणाऱ्या मिनीट्रेनमधून मोठ्या प्रमाणात पर्यटक नेरळ येथे सकाळपासून येऊन थांबतात. शनिवार-रविवार वगळता नेरळ येथून दिवसभरात केवळ तीन प्रवासी फेºया माथेरानकरिता होत असतात. त्यामुळे मिनीट्रेनमधून प्रवास करण्यासाठी पर्यटक हे सकाळपासून तिकीट रांगेत असतात. ८ मे रोजी सकाळी ९ वाजता माथेरानकरिता मिनीट्रेन निघाली होती. शाळांना सुट्टी पडल्याने आणि सगळीकडे वातावरणात उष्मा निर्माण झाल्याने मुंबईकर हे माथेरानकडे वळले आहेत, त्यामुळे पर्यटकांनी हाउसफुल होऊन निघालेली मिनीट्रेन नेरळ येथून तीन किलोमीटर अंतर गेल्यानंतर जुम्मापट्टी स्टेशनच्या अलीकडे थांबली. इंजिन बंद पडल्याने मिनीट्रेन थांबवावी लागली.
अर्धा तास गाडी थांबल्यानंतर नेरळ येथील कार्यशाळेतून कर्मचारी आल्यानंतर मिनीट्रेन एनडीएम १-४०५ हे इंजिन पुन्हा सुरू केले आणि अर्ध्या तासांहून अधिक काळ थांबलेली मिनीट्रेन पुन्हा माथेरानकरिता रवाना झाली. मात्र, मिनीट्रेनच्या या नेहमीच्या रडगाण्यामुळे पर्यटकांचे हाल होत आहेत. वारंवार बिघाड होत असल्याने नाराजी व्यक्त के ली जात आहे.