पनवेल : राफेल विमान खरेदीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे. क्लीनचिट देऊनही राहुल गांधी जुमानत नाही. राजकीय फायद्यासाठी देशाची दिशाभूल केल्याबद्दल आणि देशाची सुरक्षितता धोक्यात आणल्याबद्दल त्यांनी माफी मागितली पाहिजे, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भंडारी यांनी शनिवारी पनवेल येथे पत्रकार परिषदेत केली.परिषदेस सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर कविता चौतमोल, भाजपाचे तालुका अध्यक्ष अरु ण भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, उपमहापौर विक्रांत पाटील, रायगड लोकसभा विस्तारक अविनाश कोळी, तालुका सरचिटणीस दशरथ म्हात्रे, माजी पंचायत समिती सदस्य नीलेश पाटील आदी पदाधिकारी उपस्थित होते.भंडारी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ आणि पारदर्शी राजवट दिली असून काहीही करून त्यांना भ्रष्टाचाराचा डाग लावण्यासाठी काँग्रेसकडून खोटेनाटे आरोप होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने विमानांच्या खरेदीची प्रक्रि या, किंमत आणि भारतीय आॅफसेट पार्टनरची निवड याबाबतीत विचार करून कोणताही गैरव्यवहार नसल्याचा निर्वाळा दिला आहे. त्यामुळे गांधी यांचा खोटारडेपणा उघड झाला आहे.सिडकोचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश प्रगतीच्या, विकासाच्या दृष्टीने पुढे चालला आहे. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक सरकारला नाहक बदनाम करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे सांगितले.
राजकीय फायद्यासाठी देशाची दिशाभूल - माधव भंडारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2018 3:42 AM